- हुसेन मेमनजव्हार : तालुक्यात पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरू असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील कित्येक रस्ते, मोऱ्या वाहून गेल्याची घटना घडली तर घरे जमीन दोस्त झाली. कित्येक पूल पाण्याखाली जाऊन पुलांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जव्हार तालुक्यात आजही पावसाचा जोर कायम असून संततधार सुरू आहे. १ ते ६ आॅगस्टदरम्यान साखरशेत मंडळात ६८७, जामसर मंडळात ९६०, जव्हार येथे १०४५ मि.मी. तर तालुक्यात २६९२ मि.मी. अशी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जूनपासून आजतागायत ३७६५.६७ मिमी. इतकी नोंद केल्याची माहिती जव्हार अपातकालीन यंत्रणेकडून मिळाली.पावसामुळे खेड्यापाड्यातील जवळपास ४० घरांची छोटी मोठी पडझड झाली असून त्यांचे पंचनामे करण्यात आल्याची नोंद आहे. यामुळे गरीब आदिवासी कुटुंबाचे हाल झाले आहेत. पावसाचा जोरही वाढल्याने कित्येक गावांचा संपर्कही तुटला होता. या प्रलयामुळे कित्येक कुटुंब बेघर झाली आहेत.चौथ्याची वाडी येथील रस्ता दोन दिवसांपूर्वी वाहून गेल्यामुळे ३५ ते ४० गावांचा संर्पक तुटला असून यामुळे हजारो नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत तहसीलदार संतोष शिंदे यांनी बांधकाम विभागाला रस्ता तत्काळ दुरूस्त करून पूर्ववत करण्याचे निर्देश दिले असून बांधकाम विभागाने कामही सुरू केल्याचे सांगितले. बायपास रोडही खचला असून त्या रस्त्याची दुरूस्ती तत्काळ करून रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जव्हार तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:18 IST