ठाणे : एका डॉक्टरला ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध चितळसर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. फिजिओथेरपीच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करून या प्रकाराची तक्रार करण्याची धमकी डॉक्टरला दिली. ठाण्यातील एका फिजिओथेरपीस्टशी अमोल पाटील नामक तोतया पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी संपर्क साधला. या फिजिओथेरपीस्टकडे कामाला असलेल्या मुली नैसर्गिक उपचाराच्या नावाखाली पुरुषांना सर्व प्रकारच्या ‘सेवा’ देतात, असा आरोप त्याने केला. या प्रकाराचे चित्रीकरण आपल्याकडे असून यासंदर्भात तक्रार करून उपचार केंद्र बंद करण्याची धमकी त्याने दिली. कापूरबावडी पोलीस ठाण्यात आपण पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून कारवाई टाळायची असेल, तर पोलीस ठाण्यात येऊन भेटा, असेही त्याने सांगितले. बुधवारी रात्री डॉक्टरने त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्याने ५ लाख मागितले. डॉक्टरांच्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी गुरुवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
तोतया पोलिसाने मागितली खंडणी
By admin | Updated: March 25, 2017 01:12 IST