वासिंद : शहापूर तालुका आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद अंतर्गत रायकरपाडा (जिजामातानगर) येथे उपकेंद्र मंजूर झाले होते. परंतु, आरोग्य विभागाकडून जागा नसल्याचे कारण पुढे करून गेल्या अनेक वर्षांपासून ते कागदावरच आहे. सार्वजनिक आरोग्य ही मोठी गहन समस्या वासिंद पूर्वच्या नागरिकांना भेडसावत असल्याने भारिप बहुजन महासंघ शहापूर तालुकाध्यक्ष संजय बन्सी भालेराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तालुका आरोग्य पर्यवेक्षक पी.एम. खाचने पंचायत समिती शहापूर यांना निवेदन देऊन हे उपकेंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.वासिंद पूर्वेला ३ वॉर्ड असून सर्वसाधारण लोकसंख्या १८ ते २० हजार आहे. या उपकेंद्राचा फायदा परिसरातील अनेक खेड्यांतील ग्रामस्थांनादेखील होणार आहे. पावसाळ्यात वासिंद पूर्वकडून पश्चिमेकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यासाठी तारेवरची कसरत करत अनेक गर्भवती तसेच वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनादेखील या समस्येला सामोरे जावे लागते. अनेकदा रुग्णांना अक्षरश: झोळी करून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते. या गहन समस्येबाबत वासिंद ग्रा.पं. कमिटीदेखील उदासीन असून या उपकेंद्राबाबत लक्ष देत नाही. (वार्ताहर)
रायकरपाडा आरोग्य उपकेंद्र कागदावरच
By admin | Updated: April 25, 2017 00:01 IST