ठाणे : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारच्या आंदोलनांना मनाई आदेशाद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. १ ते १५ मार्च २०२१ या १५ दिवसांमध्ये हा आदेश लागू राहणार आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि घेराव आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. ११ मार्च रोजी महाशिवरात्री तसेच छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, तर १२ मार्च रोजी शब-ए-मेराज असे सणउत्सव होणार आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलमानुसार तलवारी, लाठ्या असे कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्याला मनाई केली आहे. पाच किंवा पाचांपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा प्रतिघोषणा देणे आदींनाही मनाई आहे. सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच अंत्यसंस्कार आणि लग्नसमारंभ यासाठी हा आदेश लागू राहणार नसल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.