ठाणे : जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड या तालुक्यांसह कुळगाव बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका आदी शहरी व ग्रामीण भागात २६ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. याद्वारे एक लाख ७४ हजार ४१९ बालकांना या डोसचा लाभ दिला जाणार आहे.
उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी ही माहिती दिली. त्यापैकी ग्रामीण भागातील संख्या एक लाख पाच हजार ८४० तर शहरी भागातील संख्या ६८ हजार ५१९ एवढी आहे. लसीकरण मोहिमेसाठी एक हजार ३७२ बूथ लावले जाणार आहेत, असे डॉ. रेंघे यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. सुमारे चार लाख चार हजार २३२ लाभार्थ्यांना या मोहिमेंतर्गत जंतनाशक गोळी सेवनासाठी देण्यात येणार आहेत.