ठाणे : महापालिकांसह अन्यही निवडणुका नुकत्याच संपल्या असून निकालही हाती आले आहेत. विजेते, स्पर्धक यांच्यातील कलगीतुरा अद्याप मवाळ झालेला नाही. अशात होळीची मौजमस्ती कारणीभूत ठरून अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता आहे. यास वेळीच पायबंद घालून संभाव्य धोके, संकट टाळण्यासाठी होळी, धुलीवंदन, रंगपंचमीच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रात मनाई आदेश जारी करून होळी शिस्तीत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणातील झाडे व लाकडे तोडण्यास, जाळण्यास, दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर रंगीत पाणी, रंग किंवा पदचाऱ्यांवर पावडर फेकणे, उडविण्यास प्रयत्न करणे, आरोग्यास उपायकारक होईल अशा रासायनिक रंगाचा वापर करणे, रंगाचे फुगे, पाण्याचे फुगे , इतर द्रव पदार्थाचे फुगे बनविणे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकून मारणाऱ्यांवर पोलिसांकडून चांगलाच चोप दिला जाणार आहे. आरोग्यास व जीवास धोका निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचे वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक जागेत अश्लील शब्द उच्चारणे, हावभाव, घोषणा देणे, अश्लील गाणी गाणे, वाकुल्या व विडंबनचे प्रदर्शन करणे, भरविणे किंवा एखाद्याची प्रतिष्ठा, योग्यता व नैतिकतेला धक्का पोहचेल, असे कोणतेही कृत्य कोणी केल्यास, करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.लोकांना त्रास सार्वजनिक शांततेस बाधा अथवा दंगा मारामारी होवू नये म्हणून हा मनाई आदेश जारी केला आहे. या काळात शस्त्रे बाळगणे, जमाव जमविणे यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश ११ मार्च पासून १२ वाजेपासून ते १७ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरु द्ध करवाई करण्यात येईल, असे पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)धुलीवंदनाला पाण्याचा अपव्यय टाळा; पाणीसाठा कमी होतोयमहापालिका, नगरपालिका त्यांच्या मंजूर पाणी कोट्यपेक्षा २१० एमएलडी जादा पाणी उचलत आहेत. आणखी जादा पाणी वापरल्यास मागील वर्षाप्रमाणे पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी होळी, धुलीवंदनच्या निमित्ताने पाण्याचा अपव्यय टाळणे हिताचे आहे.सतत पाणी उपसा होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठादेखील कमी होत आहे. यासाठी मंगळवारी बैठक घेऊन जादा पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे लघूपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांनी सर्व महापालिकांना सांगितले. जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिकाना सुमारे एक हजार २४० एमएलडी पाणी दैनंदिन पाणीपुरवठा मंजूर आहे. सद्यस्थितीला एक हजार ४५० एमएलडी पाणी रोज वापरले जात आहे. सुमारे २१० एमएलडी पाणी जादा उचलले जात आहे. याची भर काढण्यासाठी आठवड्यातून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. अधिक टंचाईला तोंड देण्याचा प्रसंग उद्भवू नये म्हणून पाण्याचा अपवेय टाळणे गरजेचे आहे, अशा सूचना मंगळवारी झालेल्या बैठकीत संबंधीत महापालिकांच्या पाणीपुरवठा विभागाला दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. सध्या भातसा धरणात ५९.६७ टक्के, आंध्रात ४३.४९ टक्के, बारवीत ६३.७६ टक्के, बदलापूर बंधाऱ्यात केवळ १२ दलघमी. पाणी साठा शिल्लक आहे
होळीवर पोलिसांचा वॉच; जिल्ह्यात मनाई आदेश
By admin | Updated: March 11, 2017 02:36 IST