मुुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत साजऱ्या होणाऱ्या नवरात्रौत्सव आणि बकरी ईद या दोन सणांसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरातील मोठ्या गरबा आयोजकांसोबत बैठका घेऊन पोलिसांनी सज्जतेचे आदेश दिले. शहरात दसऱ्यापर्यंत दांडिया, गरब्याची धूम असेल. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर आयोजन होणाऱ्या कोरा केंद्र, गोरेगाव आदी सुमारे ५० गरब्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या गरब्यामध्ये सहभागी होणाऱ्यांच्या सुरक्षेची, महिलांसोबत गैरवर्तन घडणार नाही याची तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना दूर ठेवावे यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमणे, सीसीटीव्ही आणि निगराणीसाठी कंट्रोल रूम उभारावी, पार्किंगसाठी उपाययोजना करावी, जेणेकरून वाहतुकीचा खोळंबा होणार नाही़ आयोजकांनी आवाजाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अशा सूचना पोलिसांनी आयोजकांना केल्या आहेत. नवरात्रौत्सवात गरब्याच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत मिसळून गुन्हेगारी प्रवृत्तींवर करडी नजर ठेवणार आहेत. नवरात्रौत्सव आणि ईदच्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या सुट्या रद्द झाल्याचे मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By admin | Updated: September 26, 2014 01:49 IST