भिवंडी - कोनगाव पोलीस ठाण्यात १० हजारांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शन पथकाने पोलीस उपनिरीक्षकास अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेश डोंगरे असे अटक केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणातील एका संशयित आरोपीला शिक्षा होऊ नये यासाठी डोंगरे यांनी त्याच्याकडून ८० हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली होती.तपासात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने शनिवारी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोनगाव पोलीस ठाण्यात सापळा रचून पोलीस अधिकारी राजेश डोंगरे यांना १० हजार रुपये घेताना ताब्यात घेतले व नंतर अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.