लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे शहर पोलिसांनी गेल्या पाच दिवसांपासून विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी (२५ फेब्रुवारी) एकाच दिवसात विनामास्क फिरणाऱ्या ८९२ जणांकडून दोन लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळावे, यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक करवाई केली जात आहे. त्यानुसार २२ मार्च रोजी एका दिवसात मास्क परिधान न करणाऱ्या ३४४ जणांविरुद्ध कारवाई केली. त्याचबरोबर मंगल कार्यालय, हॉटेल, दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये बैठका घेतल्या. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमार्फत ध्वनिक्षेपकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
ठाणे शहरातील बाजारपेठा, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक तसेच प्रमुख रस्त्यांवर मास्क नसलेल्यांविरुद्ध गुरुवारीही मोठी कारवाई करण्यात आली. ठाणे शहरात विनामास्क फिरणाऱ्या ८६ व्यक्तींकडून ४३ हजारांचा दंड वसूल केला. भिवंडीत ३१७ जणांकडून ७३ हजार ३५० रुपये, कल्याणमध्ये १२६ नागरिकांकडून ५९ हजार ७०० रुपये, उल्हासनगरमध्ये २९२ लोकांकडून ७४ हजार ५०० रुपयांचा दंड तर वागळे इस्टेट परिमंडळामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ७९ लोकांकडून २८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, १४९ नुसार ११९ जणांविरुद्ध नोटिसा बजावल्या आहेत. संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ९२ ठिकाणी पोलिसांनी जनजागृती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरण मोहीम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे हे गरजेचे आहे. वारंवार आवाहन करूनही मास्क लावण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आता मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
- संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर