Playhouse, lake restriction used again ;; | नाट्यगृह, तलावाच्या वापरावर पुन्हा निर्बंध?; मतदारसंघांच्या कार्यालयांसाठी हवी जागा
नाट्यगृह, तलावाच्या वापरावर पुन्हा निर्बंध?; मतदारसंघांच्या कार्यालयांसाठी हवी जागा

डोंबिवली : राज्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची केव्हाही घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कार्यालयांसाठी निवडणूक विभागाने सरकारी मालमत्तांचा शोध सुरू केला आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह, कल्याण ग्रामीणसाठी क्रीडासंकुलातील तरणतलावाची जागा कार्यालयासाठी वापरण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही तरणतलावासह नाट्यगृहाच्या वापरावरही निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य ठेवण्यासाठी तसेच निवडणुकीच्या कामासाठी बाहेरून येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था निवडणूक विभागाकडून त्या-त्या मतदारसंघामध्ये केली जाते. एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी, क्रीडासंकुलातील तरणतलावाची जागा कल्याण लोकसभा कार्यालयासाठी घेण्यात आली होती. शाळा-महाविद्यालयांना लागलेली उन्हाळी सुटी आणि त्यात तरणतलावासह व्यायामशाळा वापरावर आलेले निर्बंध पाहता खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच आल्याच्या निषेधार्थ व्यायामपटूंकडून प्रतीकात्मक आंदोलनही छेडण्यात आले होते. अखेर, त्याची दखल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेत तरणतलाव आणि व्यायामशाळेचा वापर सुरूच ठेवला. पण, मतदानप्रक्रिया आणि मतमोजणीवेळी या सुविधा बंद ठेवल्या होत्या. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडासंकुलातील तरणतलाव आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची जागा निवडणूक विभाग मागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. डोंबिवली मतदारसंघासाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, तर कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे कार्यालय तरणतलावाच्या जागेत थाटण्यात येणार आहे.

मंगळवारी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी डोंबिवली मतदारसंघाचे कार्यालय सावित्रीबाई फुले नाट्यगृहात असेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. तर, कल्याण ग्रामीणला तरणतलावाची जागा हवी असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी या वास्तू निवडणूक विभागाने मागितल्याने खेळाडूंसह आता नाट्यरसिकांच्याही मनोरंजनावर टाच येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक विभागाकडून जागेसाठी आतापर्यंत अर्ज आलेला नाही, अशी माहिती केडीएमसीचे मालमत्ता विभागाचे अधिकारी प्रकाश ढोले यांनी दिली.

डोंबिवली शहरामध्ये ३२८ मतदानकेंद्रे
पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर असणाºया मतदान केंद्रांमुळे मतदारांना जिन्याने चढउतार करताना त्रास होत असल्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने सर्व मतदानकेंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवली विधानसभा निवडणुकीसाठी सावित्रीबाई फुले कलादालनात कार्यालय असेल. डोंबिवलीमध्ये ३२८ मतदानकेंद्रे आहेत, अशी माहिती डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली. मतदारसंघात तीन लाख ५२ हजार मतदार असून यात एक लाख ८९ हजार पुरु ष, तर एक लाख ६९ हजार महिला मतदार आहेत. या यादीत आणखी दोन हजार मतदारांची वाढ होण्याची शक्यता पाटोळे यांनी व्यक्त केली आहे. तर, लोकसभा निवडणुकीनंतर ११ हजार मतदारांनी नव्याने नोंदणी केली असून या सर्व मतदारांना मतदारयादीत समाविष्ट केले आहे. डोंबिवली विधानसभेसाठी सध्या ३२८ मतदानकेंद्रे प्रस्तावित असली, तरी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या केंद्रांचेविभाजन करत नवी मतदानकेंद्रे तयार केली जातील. यामुळे दोन किंवा तीन मतदानकेंद्रे वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

बंद कसे ठेवायचे? : सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या वास्तूची निवडणूक विभागाकडून मागणी होत आहे. पण, १० महिने वातानुकूलित यंत्रणेच्या कामानिमित्त बंद असलेले नाट्यगृृह जुलैमध्ये सुरू झाले आहे. तर, डिसेंबरपर्यंत नाटके व अन्य कार्यक्रमांनिमित्त तारखांचे वाटप झाले आहे. निवडणूक विभागाने ताबा घेतला तर नाट्यगृह बंद ठेवावे लागणार आहे. मात्र, ते परवडणारे नसल्याने नाट्यगृह बंद कसे ठेवायचे, असा प्रश्न केडीएमसीला पडला आहे.

जागा निश्चित झालेली नाही : नाट्यगृहाची जागा निश्चित झालेली नाही. फक्त अंदाज मांडला आहे. नाट्यगृहाची जागा मिळाली तर नाट्यगृह बंद ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण, आमची कार्यालये वरच्या भागात असतील. खालच्या बाजूने नाट्यगृहासाठी रस्ता सुरू राहील. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवावे लागेल, अशी प्रतिक्रिया डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली.

Web Title: Playhouse, lake restriction used again ;;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.