वसई : गणेशोत्सवाच काळात आवाज आणि वेळेचे बंधन न पाळणाऱ्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तुळींज पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तर विना परवानगी बंँड आणि डीजे वापरणाऱ्या तीन मंडळांना वसई कोर्टाने प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला. वसई तालुक्यात सात पोलीस ठाणी असून एकट्या तुळींज पोलीस ठाण्याने दहीहंडी उत्सवात नियमांचे उल्लंघन करुन जास्तीचे थर लावणाऱ्या पथकांवर गुन्हे दाखल केले होते. इतर ठिकाणी सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवले गेले असतांना एकाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची हिंंमत दाखवली नव्हती. मात्र, तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी खास पथक नेमून उल्लंघन केलेल्या पाच मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला होता. गणेशोत्सव काळातही बिराजदार यांनी खास पथक नेमले असून त्यांच्यामार्फत शहरातील २०५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व गणेश मंडळांना नोटीसा बजावून कायद्याचे पालन करण्याचे आदेशही बिराजदार यांनी दिले होते. गणेशोत्सव काळात आवाज आणि वेळेची मर्यादा पाळण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी तालुक्यात सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून आवाज आणि वेळेची मर्यादा ओलांडली गेली. असे असतांना तुळींज पोलिसांनी पाच मंडळांना याप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत. त्याचा अहवाल विभागीय पोलीस उपअधिक्षकांना देण्यात आला असून त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. परवानगी न घेता बँड आणि डीजेचा वापर केल्याप्रकरणी तीन मंडळांवर मुंबई पोलीस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. त्यांना वसई कोर्टात हजर केले असताना कोर्टाने प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. वसई तालुक्यात गणेशोत्सव काळात कोर्टाकडून झालेली ही पहिलीच कारवाई ठरली. (प्रतिनिधी)
तीन गणेशोत्सव मंडळांना दंड
By admin | Updated: September 14, 2016 04:15 IST