लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर अवघ्या सहा दिवसांच्या बाळाला ९० हजाराला विकल्याचा प्रकार आजीमुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह दोन मध्यस्थ व शेख दाम्पत्य अशा सहा जणांविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, मराठा सेक्शन विभागात राहणाऱ्या विशाल व सुजाता गायकवाड या दाम्पत्याला २२ जानेवारी रोजी मुलगी झाली. त्यांना आधी दोन मुले आहेत. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने २५ जानेवारी रोजी गायकवाड दाम्पत्याने १८ वर्षापासून मूलबाळ नसलेल्या शेख दाम्पत्याला ओळखीच्या दोन मध्यस्थांमार्फत मुलीला ९० हजारात विकण्याचा निर्णय घेतला.
आरोपींना अटकविशालची आई विजया गायकवाड ही बाळ पाहण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात आली असता विशालने बाळाला विकल्याची माहिती दिली. त्यांनी विशाल व सून सुजाता या दोघांना बाळाला विकू नको, असा सल्ला दिला. विशाल, सुजाता ऐकत नसल्याने त्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विशाल, सुजाता, दोन मध्यस्थ व शेख दाम्पत्याला ताब्यात घेऊन बोलते केले. त्यांनी झालेल्या प्रकाराची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.