पारधी यांची हत्याच
By Admin | Updated: September 11, 2016 02:09 IST2016-09-11T02:09:21+5:302016-09-11T02:09:21+5:30
वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना संशयास्पद मृत्यु झालेल्या पोलीस शिपाई विनोद पारधी प्रकरणात वसई पोलीस ठाण्यात सात महिन्यानंतर अज्ञात आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला

पारधी यांची हत्याच
वसई : वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना संशयास्पद मृत्यु झालेल्या पोलीस शिपाई विनोद पारधी प्रकरणात वसई पोलीस ठाण्यात सात महिन्यानंतर अज्ञात आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाचुबंदर खाडीत वसई पोलीसांना ७ फेबु्रवारी २०१६ रोजी विनोद पारधी यांचा मृतदेह मिळाला होता.
वसई पोलीस वसाहतीत पत्नी व दोन मुलींसोबत राहणारे पोलीस शिपाई पदावर विनोद काशिनाथ पारधी (३०) २०१० मध्ये वसई पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. शनिवार ६ फेब्रुवारी २०१६ च्या सायंकाळ पासून विनोद पारधी घरी परतले नव्हते. त्यामुळे पारधी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने वसई पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
विनोद पारधी यांच्यावर एका महिला पोलीस सहकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता. या महिला पोलीसाने पारधी यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पारधी यांच्यावर शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विनोद पारधी यांना २५ जानेवारी २०१६ रोजी निलंबीत करण्यात आले होते. तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरु होती. त्यामुळे नैराश्येतून पारधी यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास होता. तर पारधी कुटुंबियांनी मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पारधी यांनी आत्महत्या केल्याचा सांगत त्यांच्या मृत्युबाबतच संशय व्यक्त केला होता.
दरम्यान, सात महिन्यानंतर पोलीस शिपाई विनोद पारधी यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्याने वसई पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर विनोद पारधी यांच्या हत्येचा गुंता सोडवताना पोलीस पारधी यांच्या मारेकऱ्याचा कसा शोध लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेचा पुढील तपास वसई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल काकडे स्वत करीत आहेत. (प्रतिनिधी)