ठाणे : येऊरमधील ‘गारवा’ हॉटेलमध्ये अनधिकृतपणे रंगलेली मद्य पार्टी हॉटेलमालक विजय सिंग यांना चांगलीच महागात पडली आहे. वर्तकनगर पोलिसांनी हॉटेलचे मालक सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना गुरुवारी पहाटे अटक केली.सिंग यांनी दि. १० जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत विनापरवाना दारूची पार्टी करण्यास अनुमती दिली. पार्टी ऐन भरात आलेली असतानाच वर्तकनगर पोलिसांकडे स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली. त्याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांच्या पथकाने येऊर गावातील पाटोणपाडा येथील ‘गारवा’ हॉटेलवर धाड टाकून महाराष्टÑ दारूबंदी अधिनियम कलमानुसार हॉटेलमालक सिंग यांना गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. या कारवाईने येऊर परिसरातील हॉटेलचालक, मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी याच परिसरातील एका हॉटेलमध्ये रंगलेल्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गोळीबार झाला होता. यात एका पोलीस हवालदाराचाही समावेश होता. त्यानंतर अनधिकृतपणे चालणा-या मद्य पार्ट्यांना पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वनविभागाने चांगलाच चाप लावला. ‘थर्टी फर्स्ट’ला नववर्ष स्वागताच्या निमित्ताने रंगण-या विनापरवाना पार्ट्यांवरही बंदी केल्याने यंदा डीजेच्या दणदणाटावर नियंत्रण आणण्यात वर्तकनगर पोलिसांना यश आले. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाण्याच्या येऊरमधील बेकायदा दारूच्या पार्टीमुळे ‘गारवा’ हॉटेलचा मालक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:11 IST
निसर्गरम्य येऊर भागातील परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित असल्यामुळे याठिकाणी डीजे आणि मद्य पार्टीला बंदी आहे. त्यामुळे येथील गारवा हॉटेलमध्ये रंगलेल्या मद्य पार्टीवर वर्तकनगर पोलिसांनी कारवाई केली.
ठाण्याच्या येऊरमधील बेकायदा दारूच्या पार्टीमुळे ‘गारवा’ हॉटेलचा मालक अटकेत
ठळक मुद्देविनापरवाना दारु पार्टीला दिली परवानगीवर्तकनगर पोलिसांनी केली कारवाईगुरुवारी पहाटेची घटना