पंकज पाटील, बदलापूर: बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी चांगली साथ दिली असून तब्बल 58.30% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. ही वाढलेली मतदानाची आकडेवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लांबच लांब लांब लावली होती. मतदारांचा उत्साह देखील जास्त होता. दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल 47% मतदानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मतदानाचा शेवटचा आकडा हा 60% च्या घरात जाईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार बदलापुरात 58.30% मतदानाची नोंद झाली.
- अनेक मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. अनेक मतदारांना इतर प्रभागात स्थलांतरित केल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
- राजकीय पुढार्यानी देखील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
- मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या असल्या तरी त्या ठिकाणी मतदानाची आकडेवारी मात्र घसरली नाही. सर्वच प्रभागात मतदाराची आकडेवारी योग्य राहिली.
- न्यायालयीन निकालामुळे प्रलंबित राहिलेल्या सहा जागांसाठी 20 डिसेंबर रोजी पुन्हा निवडणूक घेण्यात येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी देखील सर्वच राजकीय पक्ष ताकद पणाला लावणार आहेत.