शाळाबाह्य मुलांना सापडली शिक्षणाची वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:01 AM2019-01-23T01:01:31+5:302019-01-23T01:01:42+5:30
रस्त्यांवर फिरणारी, रेल्वे व बस स्थानकांवर राहणारी तसेच झोपडपट्टीतील तीन हजार मुलांना हेरून रॉबिनहूड अकादमी या सामाजिक संस्थेने २०१४ पासून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण : रस्त्यांवर फिरणारी, रेल्वे व बस स्थानकांवर राहणारी तसेच झोपडपट्टीतील तीन हजार मुलांना हेरून रॉबिनहूड अकादमी या सामाजिक संस्थेने २०१४ पासून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. शिक्षणाची आवड निर्माण झाल्याने मुलेही शिकू लागल्याने संस्थेने समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्यांवर अनेक निराधार मुले फिरत असतात. रेल्वे, बस स्थानके, फलाटांवर त्यांचे वास्तव्य असते. याशिवाय झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी अनेक मुलेही शिक्षण घेत नाहीत. तर, अनेक मुले विविध कारणास्तव शाळेत जात नाहीत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सरकारचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. तर, सरकारच्या शैक्षणिक योजना प्रभावीपणे राबवण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. त्यावर नामी तोडगा काढण्याचे काम संस्थेने २०१४ पासून सुरू केले आहेत.
संस्थेचे जवळपास एक हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक व कार्यकर्ते मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या उपनगरात काम करत आहेत. ते साप्ताहिक सुटीचा फावला वेळ रॉबिनहूड अकादमीला देतात. रेल्वेस्थानक परिसर व फलाट, झोपडपट्ट्यांमधील शाळेत न जाणारी मुले ते प्रथम हेरतात. दोन ते तीन दिवस सतत पाहणी केल्यावर शाळाबाह्य मुले कोणती हे त्यांच्या लक्षात येते. कार्यकर्ते त्यांना गाठून शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. त्यामुळे ही मुले शिकण्यासाठी तयार होतात. स्टेशन परिसर, झोपडपट्टी येथे योग्य व स्वच्छ जागा पाहून अशा मुलांना शनिवार व रविवारी शिकवण्याचे काम कार्यकर्ते करतात. मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. त्यांची पुढे शिकण्याची इच्छा असल्यास त्यांना पाठपुस्तकाप्रमाणे अभ्यासक्रम शिकविला जातो. सध्या तीन हजार मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत. त्याचा फायदा त्याना त्यांच्या आयुष्यात होणार आहे.
> निरक्षरतेला दूर सारण्याचे काम
निरक्षरतेला दूर सारणारा ‘रॉबिनहूड’ त्यांना आजच्या आधुनिक जगात मिळाला आहे. हेच त्यांच्या पुढील आयुष्याला दिशा देणारे ठरणार आहे. दीपक सिंग हे संस्थेचे समन्वयक आहेत. तर, कल्याण-डोंबिवली परिसरात प्रतिक शुक्ला व कृतिका तिवारी हे दोघे पाहत आहेत.प्रतिक हा शालेय शिक्षण घेतानाच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. त्याची ही बाब उल्लेखनीय आहे.