ठाणे : भार्इंदरपाडा येथे एकाच ठिकाणी सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीचा अनोखा प्रस्ताव तयार करून तो पहिल्याच महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्याच्या हालचाली सुरू असतानाच या प्रस्तावाला जोरदार विरोध सुरू झाला आहे. आपल्या कंपनीचा विकास प्रकल्प त्या जागेच्या ठिकाणी सुरु असल्याने व्यवसायावर या स्मशानभूमीचा परिणाम होऊ शकतो, असे सांगत शिवसेनेचे नगरसेवक पूर्वेश सरनाईक आणि परिषा सरनाईक यांनी या प्रस्तावाविरोधात लक्षवेधी मांडली आहे. या स्मशानभूमीचा विचार करण्यापूर्वी पोखरण १ आणि २ परिसरातील स्मशानभूमीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणीही त्यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे. प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांनीच विरोध दर्शविल्याने महासभेत याचे पडसाद काय उमटणार, हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. ज्या ठिकाणी ही स्मशानभूमी बांधण्याचा प्रस्ताव आहे, ती जागा विहंग ग्रूप कंपनीच्या जागेत येते. या ठिकाणी कंपनीच्या गृहप्रकल्पाचे काम देखील सुरु आहे. भार्इंदरपाड्याच्या आधी पोखरण रोड नं १ आणि २ परिसरात स्मशानभूमीची गरज असताना याकडे मात्र पालिका विकासकाच्या फायद्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक पूर्वेश सरनाईक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी केला आहे. या दोन्ही स्मशानभूमीमुळे संघर्ष सुरु झाला असून या मुद्द्यावरून पहिल्याच महासभेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. सर्वधर्मियांकडून स्मशानभूमीची मागणी जोर धरू लागल्याने पालिका प्रशासनाने भार्इंदरपाडा येथील जागेवर एकाच ठिकाणी स्मशानभूमी तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला. मात्र या प्रस्तावरुन राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. स्मशानभूमीच्या मालकी हक्काबाबत प्रश्न उपस्थित करून भार्इंदरपाडा येथील स्मशानभूमीपूर्वी ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीची आवश्यकता आहे त्यात्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित केल्यानंतरच या स्मशानभूमीस मंजुरी द्यावी व तोपर्यंत हा प्रस्ताव स्थगित ठेवावा अथवा महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीच्या जागांच्या तपशिलासह फेरप्रस्ताव मांडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सर्वधर्मीयांच्या स्मशानाला विरोध
By admin | Updated: March 16, 2017 02:54 IST