ठाणे : जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आदी निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. या निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकवला जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ठाण्यात गुरुवारी दुपारी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात पालघरमधील उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी हे संकेत दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कोत्या वृत्तींना दिघे कळणार नाहीत
दिघे यांच्या कार्याची, कामाची उंची मोजण्याचे काम कोणी करू नये. कोत्या वृत्तीच्या लोकांना दिघे कळणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला.
मतचोरीबाबत आधी पुरावे सादर करा
मतचोरीबाबत पुरावे सादर करावेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले असतानाही राहुल गांधी हे आरोप करीत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हरल्यावरच आरोप करतात. ईव्हीएमवरील मतदान कोणाच्या काळात झाले, याचा अभ्यासही त्यांनी करावा, असा सल्ला शिंदे यांनी दिला.