ढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 03:08 AM2018-09-23T03:08:47+5:302018-09-23T03:08:53+5:30

गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात.

only 35 to 40 percent of the business for dhol tasha | ढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका

ढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका

Next

- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात. अनेक गणेशभक्तही आपल्या लाडक्या बाप्पाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यासाठी त्यांना वाजंत्रीच्या कामाच्या आॅर्डर देतात. यंदाही डोंबिवलीत ५०० वाजंत्री दाखल झाले होते. मात्र, यंदा व्यवसाय तेजीत नसल्याने अंदाजे ३०० पथकांनी परतीची वाट धरली आहे. यंदाच्या वर्षी ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याचे एका पथकाचे प्रमुख भारत पाटोळे यांनी सांगितले.
पाटोळे म्हणाले, ‘बुलडाणा जिल्ह्यातून अंदाजे ६० पथके डोंबिवलीत आली आहेत. मागील १० वर्षांपासून आम्ही गणेशोत्सवात येथे येतो. या दिवसांत गावी फार कामे नसतात. यंदा ढोलताशा वाजवून चांगली कमाई होईल, असे वाटत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत या आशा फोल ठरत आहे. मागील वर्षी पावसामुळे व्यवसाय कमी झाला होता. तरीदेखील, ५० टक्के ग्राहकांकडून आॅर्डर मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्याहीपेक्षा कमी व्यवसाय झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यंदा मानधनही कमी केले आहे. मागील वर्षी एक तासाला तीन हजार रुपये मिळाले होते. यंदा दोन हजार रुपये मिळाले आहेत. दीड, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जात असल्याने त्या दिवसापुरते काम मिळते. त्यानंतरचे दिवस बसून काढावे लागतात. एका पथकात चार माणसे ढोलताशा वाजवण्यासाठी जातात. ढोलताशांकडे हळूहळू लोकांचा कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे.’
बुलडाण्यामध्ये सर्व गणपतींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होते. मागील सात दिवसांत चांगला व्यवसाय न झाल्याने आता गावाकडे तरी थोडीफार कमाई होईल, या आशेने अनेक पथकांनी परतीची वाट धरली. गणेशोत्सवानंतर मजुरी करून या पथकांतील सर्वजण आपली दिनचर्या चालवतात. यंदा शहरात व्यवसाय चांगला झाला नाही. एका माणसाला दिवसभरात २०० रुपये खर्च येतो. ग्राहक आले तरी घासाघीस करतात. त्यामुळे दीड हजारात एक आॅर्डर घेतो. काही नाही त्यापेक्षा किमान जेवण व प्रवासाचा खर्च तरी निघावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कमी दरात आॅर्डर घेतल्या जातात. त्यामुळे गावी जाईपर्यंत दोन हजार रुपये हातात उरतात, असे पाटोळे यांनी सांगितले.

दुकानाबाहेरच काढतात रात्र
वाजंत्रीकामासाठी डोंबिवलीतील चाररस्ता परिसरात दरवर्षी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून मंडळी येतात. यंदाही मलकापूर, राहुरी, शेगाव, नांदुरा, अकोला, खामगाव येथून वाजंत्री आले होते.

राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना दुकानाबाहेरच्या जागेत भटक्या कुत्र्यांसोबत झोप काढावी लागत आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी कुणी पुढे येत नाही.

सरकारने त्यांची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा या मंडळींची आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेती चांगली होत नाही, म्हणून आधीच त्रस्त आहे. त्याला वाजंत्रीकामातून काही दोन पैशांची अपेक्षा होती. ती देखील फोल ठरली आहे. अशा परिस्थितीत वाजंत्री काम करणाऱ्यांचा वाली कोण, असा सवालही त्यांनी केला आहे.

Web Title: only 35 to 40 percent of the business for dhol tasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.