लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या दुस-या लाटेचा कहर पाहता गेल्या महिनाभरात जिल्ह्यात एक लाख ४८ हजार २९५ रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार लाख १३ हजार २५२ झाली आहे. यातून एप्रिल महिन्यात एक लाख ३३ हजार ७२० रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०४ टक्के असल्याचे निदर्शनात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या साथीची चर्चा सध्या जीवघेणी ठरत आहे. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी यातून मुक्त होण्यासाठी लसीकरण केंद्रांवर एकच गर्दी केली आहे. तर काहींनी सर्दी, खोकल्याची चाहूल लागताच वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्याही करून घेतल्या आहेत. यामध्ये जेनेटिक तपासण्यांसह स्वॅब टेस्टिंगचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला. गेल्या १० दिवसांत दोन लाख ८१ हजार ७५९ जणांनी स्वॅब टेस्ट केल्या आहेत. यातही तब्बल ४७ हजार ७५६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, दोन लाख २९ हजार ४३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
३६ लाख नागरिकांनी केली स्वॅब टेस्टिंग
जिल्ह्यात गेल्या १० दिवसांत उपचार घेऊन ५९ हजार ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या १० दिवसांच्या कालावधीत मृतांची संख्याही वाढली आहे. तब्बल एक हजार २९१ रुग्णांचे १० दिवसांत निधन झाले आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या १० दिवसांपूर्वी सहा हजार २३५ होती. ती आता सात हजार ५२६ झाली आहे. या कालावधीपर्यंतच्या १० दिवसांपूर्वी एकूण ३३ लाख २१ हजार ५७४ स्वॅब टेस्टिंग केल्या होत्या. यासह आतापर्यंत ३६ लाख तीन हजार ३३३ जणांनी ही तपासणी केली आहे. यातून चार लाख ६४ हजार १३३ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. तर, कोरोना नसल्यामुळे ३१ लाख ३० हजार ८४६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.