उल्हासनगर : संशयित रुग्णाचा क्वारंटाइन करता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणार आहे. एका अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, आलेला खर्च महापालिका करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. महापालिकेने त्यासाठी नाशिक येथील एका कंपनी सोबत करार केला असून, ९ जूनपासून कामाला सुरुवात होणार आहे. उल्हासनगर महापालिकेने संशयित कोरोना रुग्णाचा अहवाल तत्काळ मिळण्यासाठी नाशिक येथील एका कंपनीसोबत करार केला. कंपनी अद्ययावत पद्धतीने छातीचा एक्स रे काढून, सदर एक्स रेचा कोविड अहवाल तयार करणार आहे. अहवाल २ व ३ मिनिटांत मिळणार असून, रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटीव्ह आदींची तत्काळ माहिती मिळणार आहे. सद्यस्थितीत संशयित रुग्णांना क्वारंटाईन करून त्यांचा स्वाब घेतला जातो, स्वाबचा अहवाल येण्यापर्यंत रुग्णांना वाट पाहावी लागते. मात्र या त्रासातून पलिकेसह रुग्णाची सुटका होणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. एका रुग्णाच्या अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, महापालिका स्वतः खर्चाचा भार उचलणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती शिंपी यांनी दिली आहे.
CoronaVirus News: आता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा रिपोर्ट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 20:23 IST