ठाणे : वर्षभरापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगारास वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्राणघातक हल्ला आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.लोकमान्य नगरचा रहिवासी सागर रावळ (२६) हे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध खून, दरोडे, प्राणघातक हल्ला आणि दंगलीसारखे जवळपास डझनभर गुन्हे ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल असून, उर्वरित गुन्हे वागळे इस्टेट आणि नौपाडा पोलीस ठाण्यात आहेत. वर्तकनगर पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र दरोडा, हल्ला आणि दंगलीच्या तीन गुन्ह्यांमध्ये सागरचा शोध वर्तकनगर पोलीस वर्षभरापासून घेत होते.दरम्यान, सागर रावळ हा कल्याण रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर आणि पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळून आरोपीला अटक केली. आरोपीजवळ कोणतेही शस्त्र नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आपण वर्षभर चेन्नईला होतो, असे सागरने पोलिसांना सांगितले. त्याच्या माहितीची पोलिसांनी पडताळणी केली असता, सागरची चेन्नई येथे बहिण असल्याचे समजले. त्याचे अधुन-मधून चेन्नई येथे जाणे होते, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्षभरापासून फरार ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास कल्याणमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:42 IST
दरोडे, दंगली आणि हल्ल्यासारख्या डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी मंगळवारी कल्याणमध्ये अटक केली.
वर्षभरापासून फरार ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास कल्याणमध्ये अटक
ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कारवाईआरोपीविरूद्ध डझनभर गुन्हे दाखलन्यायालयासमोर बुधवारी हजेरी