ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाचा डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) आठवडाभरात सादर होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद यांनी दिले आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास येत्या काही काळात आणखी सुखकर होणार आहे. यासंदर्भात ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेच्या वेळी ठाणे व मुलुंडदरम्यान नवीन उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वे स्थानकाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर, त्यांनी सूद यांची भेट घेतली. या माहितीनुसार या रेल्वे स्थानकाच्या कामाचा डीपीआर बनविण्याच्या कामाला आता सुरुवात झाली असून पुढील आठ-दहा दिवसांत तो केला सादर होणार आहे. दरम्यान, ठाणे-नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांतील प्रलंबित कामांचा आढावाही त्यांनी या वेळी घेतला. ठाणे रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या जागेत फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले असून ते एफओबी व स्कायवॉकवर ऐन गर्दीच्या वेळी आपले बस्तान मांडून बसलेले असतात. हा पूल फेरीवाल्यांसाठी आहे की प्रवाशांसाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या फेरीवाल्यांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाइलने हे फेरीवाले हटविण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक लवकरच
By admin | Updated: August 18, 2015 00:39 IST