ठाणे : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गुरुवारी ठाण्यातील सरकारी विश्रामगृहाबाहेर जोरदार आंदोलन केले. ओबीसींना न्याय मिळावा, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागण्यांना तातडीने मान्यता द्यावी, या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारकडे लक्ष वेधले.
महासंघाने यापूर्वीच 30 ऑगस्टपासून नागपूर येथे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केले होते. त्यास पाठींबा म्हणून ठाण्यात एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या – • मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये. • ठाणे जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावीत. • शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी. • ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात 100% शिष्यवृत्ती आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी. • ‘महाज्योती’ संस्थेसाठी हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.
महासंघाने स्पष्ट इशारा दिला की, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल. ओबीसींच्या हक्कांवर कुठल्याही प्रकारे गदा येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.