अखेर मेहता नमले ! भाजपच्या जिल्हा कार्यालयात जाऊन जिल्हाध्यक्षाचा केला स्वीकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 01:12 PM2022-05-15T13:12:04+5:302022-05-15T13:12:16+5:30

मीरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळून देखील नरेंद्र मेहतांना अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्या कडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती

Narendra Mehta went to the district office of BJP and accepted the district president | अखेर मेहता नमले ! भाजपच्या जिल्हा कार्यालयात जाऊन जिल्हाध्यक्षाचा केला स्वीकार

अखेर मेहता नमले ! भाजपच्या जिल्हा कार्यालयात जाऊन जिल्हाध्यक्षाचा केला स्वीकार

Next

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपचे जिल्हा कार्यालय व पक्ष नेतृत्वाने नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास याना मानत नसल्याचे सांगणारे माजी आमदार नरेंद्र मेहता अखेर नमले . शनिवारी त्यांनी जिल्हा कार्यालयात जाऊन व्यास यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वीकार केला . या पुढे पालिका निवडणूक व पक्ष व्यास आणि मेहता यांच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे असे यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले . त्यामुळे व्यास व मेहतां मध्ये दिलजमाई होऊन भाजपातील गटबाजी संपेल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून १६ मे रोजीच्या कार्यक्रमात भाजपातील दुफळी दिसू नये यासाठी हे तातडीचे प्रयत्न केले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे .  

मीरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळून देखील नरेंद्र मेहतांना अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्या कडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती . विविध कारणांनी वादात आणि आरोपांच्या फेऱ्यात सापडून मेहता हे चांगलेच वादग्रस्त ठरल्याने भाजपाचा पराभव झाल्याचे कारण प्रामुख्याने सांगितले जाते . त्यातच त्यांची अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली व नंतर नगरसेविकेच्या तक्रारी वरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने ते चांगलेच वादात अडकले

मेहतांनी त्यांच्या शाळे जवळील  पक्ष कार्यालय पक्षाच्या नावे इतक्या वर्षात केले नसल्याने तसेच त्यांच्या कार्यपद्धतीने नाराज तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाईंदर पश्चिम येथे जिल्ह्याचे पक्ष कार्यालय सुरु केले . पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होऊन देखील मेहता आणि त्यांचे समर्थक  पक्षाचे कार्यालय मानत नव्हते . नंतर प्रदेश नेतृत्वाने जिल्हाध्यक्ष पदी ऍड . रवी व्यास यांची नियुक्ती केल्या नंतर मेहतांनी त्याला जोरदार विरोध चालवला तसेच मेहतांना जिल्हाध्यक्ष मानत नसल्याचे ठणकावले . जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या पक्ष मेळाव्यास पक्षाचे वरिष्ठ नेते येऊन देखील मेहता व समर्थकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.  

१६ मे रोजी पालिकेच्या विकासकामांच्या उदघाटन साठी  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्याच्या कार्यक्रमाची तयारी म्हणून शनिवारी भाजप जिल्हा कार्यालयात व्यास यांनी बैठक आयोजित केली होती . तर दुसरीकडे मेहतांनी भाईंदर पश्चिमेला आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपाच्या बैठकीचे आयोजन केले होते . मेहतांच्या कार्यक्रमाला जाण्या आधी चव्हाण हे जिल्हा कार्यालयात जाऊन व्यास आदींना भेटले . नंतर मेहतांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत नंतर चव्हाण हे मेहतांना घेऊन जिल्हा कार्यालयात पोहचले . दालनात चव्हाण, व्यास , मेहता सह महापौर ज्योत्सना हसनाळे, महामंत्री अनिल भोसले , माजी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , माजी नगरसेवक संजय पांगे , महिला अध्यक्ष रिना मेहता आदी उपस्थित होते . त्यांच्यात काही चर्चा देखील झडली .   तर भाजपचे अधिकृत  जिल्हा कार्यालय व जिल्हाध्यक्ष ना न मानणारे व त्यांना आव्हान देणारे नरेंद्र मेहता तेथे पोहचल्याने शहरात चांगलीच चर्चा सुरु झाली . झुकेगा नही सांगणाऱ्या मेहतांना अखेर पक्ष व व्यास यांच्या समोर झुकावे लागल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या .  

रवींद्र चव्हाण यांनी मात्र मीरा भाईंदर भाजपात गटबाजी नसल्याचे सांगत महाविकास आघाडी व अन्य पक्ष भाजपात गट असल्याची गोष्ट पसरवण्याचे काम करतात असा आरोप केला . येणारी पालिका निवडणुक जिल्हाध्यक्ष व्यास  व स्थानिक नेते मेहता यांच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे . ह्या दोन्ही नेत्यांनी या पुढे भाजपचे संघटन - निवडणुकीत एकत्र मिळून काम केले पाहिजे .महापालिकेत मेहता लक्ष देतात त्यांनी ते लक्ष दिले पाहिजे . येणाऱ्या पालिका निवडणुकीत पुन्हा भाजपचा महापौर बनेल हा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे असे चव्हाण म्हणाले .  

 

आधीच्या गोष्टी बाजूला ठेऊन जिल्हाध्यक्ष म्हणून व्यास याना स्वीकारल्याचे सांगत या पुढे आम्ही दोघेही एकत्र दिसु असे मेहता म्हणाले .  निवडणूकित उमेदवारी आणि पक्षाचा सर्व निर्णय हा देवेंद्र फडणवीस व  प्रदेशाध्यक्ष घेतात . त्यांचा स्वतःचा सर्वे होऊन जे जिंकणारे उमेदवार होते त्यांना तिकीट दिले गेले असे सांगत तिकीट वाटप पक्ष नेतृत्वाच्या हाती असल्याचे मेहतांनी स्पष्ट केले . पक्षाचे काम जिल्हा कार्यालय व त्यांच्या पक्ष कार्यालयातून सुद्धा सुरूच राहील असे संकेत त्यांनी दिले . त्याच वेळी पक्षात जे गद्दार आहेत त्यांचा हिशोब बाकी असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी कोणाची नावे न घेता दिला .  

 

निवडणूक ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातात असे स्पष्ट करत जिल्हाध्यक्षाची जबाबदारी संघटना आणि निवडणुकीची आहे असे ऍड . रवी व्यास म्हणाले .  स्थानिक नेते मेहता व सर्व कार्यकर्ते मिळून निवडणूक लढवू  असे व्यास म्हणले . 

Web Title: Narendra Mehta went to the district office of BJP and accepted the district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.