ठाणे: खूनाच्या गुन्हयात न्यायाधीन बंदी असलेले आरीफ अन्वर अली आणि विजय कमलकांत मिश्रा उर्फ समीर या दाेन्ही आराेपींनी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यांना पुन्हा पकडण्यात आल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी बुधवारी दिली.
आरीफ आणि विजय या दाेघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल आहे. ९ सप्टेंबर राेजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे मध्यवर्ती कारागृहातील फर्निचर काम सुरु असलेल्या कारखान्यात त्यांच्यासह २० कैदी हे सुतारकाम करीत हाेते. सर्वच कैदी आणि त्यांच्यावर देखरेख करणारे कारागृह रक्षक हेही व्यस्त असल्याची संधी साधत कारागृहाची मुख्य तटबंदी आणि आतील तट यांच्या मध्यभागी असलेल्या भिंतीवरुन पळून जाण्याचा या दाेघांनी प्रयत्न केला.
परंतू, हा प्रकार कारागृहातील पाेलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या दाेघांनाही दाेन्ही बाजूंनी घेरले. त्यामुळे त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याप्रकरणी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध् गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी दिली.