कोरोनाचा प्रसार कमी करण्यात पालिकेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:45 AM2020-09-24T00:45:39+5:302020-09-24T00:45:52+5:30

पॉझिटिव्ह रुग्ण सहा टक्के : महापालिकेने मिळवले कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण

The municipality succeeds in reducing the spread of corona | कोरोनाचा प्रसार कमी करण्यात पालिकेला यश

कोरोनाचा प्रसार कमी करण्यात पालिकेला यश

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तीन महिन्यांत महापालिकेने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवले आहे. जिल्ह्यातील सर्व महापालिका मिळून जेवढ्या चाचण्या करतात, तेवढ्या चाचण्या एकट्या ठाणे पालिका क्षेत्रात होत आहेत. सर्वाधिक चाचण्या करूनही ठाण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी सहा टक्केच आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ही सर्वात कमी टक्केवारी आहे.


गेल्या तीन महिन्यांत जीपीएस प्रणालीयुक्त असा आधुनिक नियंत्रण कक्ष, उपलब्ध असलेल्या बेडची माहिती देणारा डॅशबोर्ड, अ‍ॅपचा वापर करून एका क्लिकवर बाधित रुग्णांची संपूर्ण माहिती, कंटेनमेंट झोनचा नकाशा, चाचण्या करणारी मोबाइल व्हॅनची सुविधा आणि विशेष म्हणजे भविष्यात संख्या वाढली, तरी पुरेशी आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा आधीच निर्माण करणारी ठाणे महापालिका ही जिल्ह्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. त्यामुळेच आजघडीला संपूर्ण जिल्ह्याच्या काही प्रमाणात भार ठाणे महापालिकेने उचलला असून, जवळपास ३0 टक्के इतर पालिका क्षेत्रांतील रुग्णांवर ठाणे महापालिकेकडून उपचार सुरू आहेत.


आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी २४ जून रोजी पदभार स्वीकारला, तेव्हा ठाण्याचा मृत्युदर हा पाच टक्क्यांच्या जवळपास होता. बुधवारी त्यांनी तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा हाच मृत्युदर तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. विशेष म्हणजे मृत्युदर कमी दाखवण्यासाठी इतर महापालिका केवळ एका महिन्याच्या मृत्युदराची टक्केवारी दाखवत असले, तरी ठाणे महापालिकेने गेल्या तीन महिन्यांतील मृत्यूची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. एका महिन्याचा विचार केला तर हा मृत्युदर केवळ एक टक्क्यावर आहे.


भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, तरी ठाणेकरांना चिंता करण्याचे कारण नाही. व्हेंटिलेटरसोबतच १५0 आयसीयूची सुविधा पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार असल्याचे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले. पॉझिटिव्ह रुग्णांचा जूनमध्ये हिट रेट ३३ टक्क्यांवर होता, तो आता ११ टक्क्यांवर घसरला आहे. बेड उपलब्ध न होणे, उपचार न होणे, अ‍ॅम्ब्युलन्स न मिळणे अशी एकही तक्रार तीन महिन्यांत आली नाही. आयुक्तांसोबत अनुभवी अधिकारी रात्रंदिवस काम करत असल्याने हे शक्य झाले.


मोफत इंजेक्शनची सुविधा
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना रेमडेसिविरसारखे इंजेक्शन मोफत, तर पालिका क्षेत्राबाहेरील रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध केली जात आहेत. ठाण्याचा मृत्युदर तीन टक्क्यांच्याही खाली असून, मोबाइल चाचणी वाहने दोन महिन्यांपासून सर्वत्र फिरत आहेत. बाहेरून ठाण्यात येणाºया नागरिकांची चाचणी करण्यासाठी अ‍ॅण्टीजेन टेस्ट सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अधिकाऱ्यांची अनुभवी टीम असल्याने कमी कालावधीत कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मात्र, एवढ्यावर न थांबता चाचण्या अधिक वाढवण्यात येणार आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढली, तरी ठाणेकरांना चिंता करण्याचे कारण नाही. एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही, अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे.
- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त,
ठाणे महानगरपालिका

Web Title: The municipality succeeds in reducing the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.