लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका विद्यार्थ्याला मद्यधुंद अवस्थेत जबर मारहाण करणा-या मुकेश येवले या सुरक्षा रक्षकाला शिवसमर्थ विद्यालयाच्या प्रशासनाने निलंबित केले आहे. मारहाणीचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारीत चांगलाच ‘धडा’ शिकवल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्याच्यावर ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाळेतील सीसीटीव्हीही नादुरुस्त असल्याची गंभीर बाबही यानिमित्ताने समोर आली आहे.ठाण्यातील राम मारु ती रोड येथील शिवसमर्थ विद्यालयात २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास पाचवी ब च्या विद्यार्थ्याला जबर मारहाण होत असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या निदर्शनास आली. शिवसमर्थ विद्यालयासमोरच मनसेचे नेते अभिजित पानसे यांच्या कार्यालयातून घोसाळकर बाहेर पडले, त्यावेळी या मुलाला मारहाण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा एका मुलाला तो सोडण्यासाठी बाहेर पडल्याचे कारण त्याने सांगितले. आणखी चौकशी केली असता, पोटात दुखत असल्यामुळे एका विद्यार्थ्याला वर्गशिक्षिकेच्या परवानगीने तो विद्यार्थी त्याला सोडण्यासाठी बाहेर पडला होता, असे समजले. नेमकी त्याचवेळी येवले याने त्याला हटकले आणि जबर मारहाण केली. घोसाळकर यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्याला जाब विचारत मनसेनेही त्याला चांगलाच धडा शिकविला. त्यानंतर त्याने माफीही मागितली. शिवसमर्थ साई फॅसिलीटी सर्व्हिस या खासगी कंपनीचा हा सुरक्षा रक्षक असून त्याला कामावरून त्वरित काढून टाकल्याचे शालेय प्रशासनाने म्हटले आहे. हा प्रकार गंभीर असून पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अरु ण घोसाळकर यांनी केले आहे. यावेळी परेश शिर्के, प्रितेश मोरे आणि अक्षय चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची बाब व्हायरल झाली. तशी मनसेनेही त्याला समज दिल्याची बाब व्हायरल झाली. या प्रकाराबाबत सुरक्षा रक्षकाविरुद्ध किंवा कोणाही विरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही.- अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे