कल्याण : कल्याण पूर्व भागातील आर. एल. बी. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने एका महिलेशी उद्धट वर्तन करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी चुकीचे विधान केले होते. हा प्रकार कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला चांगलाच चोप देऊन माफी मागण्यास भाग पाडले. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेचा व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकून व्हायरल केला आहे.
कल्याण काटेमानिवली परिसरात आर. एल. बी. फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून एका महिलेने काही लोन घेतले होते. त्याचे हप्ते शिल्लक असल्याने कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी अनिल भोगे याच्याशी तिने संपर्क साधला. त्या वेळी भोगे याने महिलेशी चुकीच्या भाषेत संवाद साधला. उद्धट वर्तन केले. तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे जरी आले तरी तुम्हाला लोनचा हप्ता द्यावाच लागेल, अशी भाषा केली. हा प्रकार मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे यांना कळला. त्यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीचे कार्यालय गाठून राज ठाकरे यांच्याविरोधात विधान करणाऱ्या भोगेला जाब विचारून चांगलाच चोप दिला. तसेच उठाबशा काढायला लावून माफी मागण्यास भाग पाडले.
----------------