अंबरनाथमध्ये पाणीटंचाईवरून आमदार, नगरसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:25 AM2020-12-18T00:25:48+5:302020-12-18T00:25:52+5:30

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : प्राधिकरणाच्या कार्यालयास ठोकले टाळे

MLAs, corporators agitate over water scarcity in Ambernath | अंबरनाथमध्ये पाणीटंचाईवरून आमदार, नगरसेवकांचे आंदोलन

अंबरनाथमध्ये पाणीटंचाईवरून आमदार, नगरसेवकांचे आंदोलन

Next

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता गुरुवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्रित येत एमआयडीसीचे व्हॉल्व उघडण्यासाठी आंदोलन केले. याची कल्पना येताच आमदार डॉ. बालाजी किणीकर घटनास्थळी दाखल झाले. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण करीत असल्याचा आरोप करीत आमदारांनी नगरसेवकांच्या आंदोलनात सहभागी होत प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले.
गेल्या महिन्याभरापासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करीत नाहीत. त्यातच पाणी पळविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अंबरनाथचे पाणी नेमके जाते कोठे, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरासाठी येणारे एमआयडीसीचे पाणी ज्या ठिकाणी अडविले जाते त्या ठिकाणी असलेला व्हॉल्व उघडत आंदोलन केले. याचवेळी आमदार डॉ. किणीकर हेही आले. नगरसेवकांचा संताप पाहून किणीकर यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच आमदारांची बदनामी करण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे. यावर किणीकर यांनीही नगरसेवकांना सोबत घेत थेट जीवन प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. 
त्यामुळे संतापलेल्या आमदार आणि नगरसेवकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शहरासाठी चार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा कमी होत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी येत असल्याची कबुली दिली. मात्र नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मुबलक पाणी देण्याची मागणी लावून धरली.

शहरासाठी येणारे पाणी पळविण्याचे काम राजकीय हेतूने होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. यावरून प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची प्रचिती येते.
    - उमेश पाटील, नगरसेवक
पाण्याच्या वादातून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंबरनाथकरांना मुबलक पाणी मिळावे हा आपला सातत्याने प्रयत्न असतो. मात्र काही अधिकारी आपले नाव पुढे करून आपली बदनामी करीत आहेत.
    - डॉ. बालाजी किणीकर, आमदार

Web Title: MLAs, corporators agitate over water scarcity in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.