मीरा रोड : मीरारोड येथील ग्राहकांना थेट शेतातील भाजी स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मनसेचे उपाध्यक्ष अरुण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चतुर्थीचे औचित्य साधून ग्रीनकोर्ट परिसरात स्वस्त भाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच शेतकरी व शेतकामगार यांच्या संघटनेची मूठ बांधली आहे. त्यानुसार मनसेचे मीरारोड विभाग अध्यक्ष दिनेश कनावजे यांनी पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायण गावातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या शेतातील भाजी थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. त्याला प्रतिसाद देत तेथील शेतकरी मोहन प्रताप धवडे यांनी गावातील इतर शेतकऱ्यांसह मनसेच्या स्वस्त भाजी केंद्रातून थेट शेतातील भाजी विकण्यास सुरुवात केली. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडतमुक्त शेतमालाच्या विक्रीची वाट मोकळी केल्यानंतर शहरात थेट शेतमालाची विक्री सुरु करणारा मनसे हा पक्ष पहिलाच ठरल्याच मनसेचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सचिव सुल्तान पटेल यांनी सांगितले. सकाळी १०.३० वा. सुरु केलेल्या केंद्रातील स्वस्त भाजीच्या दरामुळे अवघ्या दीड तासांत पाच हजार रुपयांचा भाजीपाला विकला गेल्याचे धवडे यांनी सांगितले. याबाबत पटेल म्हणाले की, अशाप्रकारची आणखी तीन केंद्रे १७ सप्टेंबरपर्यंत शहरातील सिल्वरपार्क, इंद्रलोक व काशिमीरा परिसरात सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मनसेकडून जागा व वीजपुरवठा मोफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
मीरारोडमध्ये मनसेच्या स्वस्त भाजी केंद्राला सुरुवात
By admin | Updated: September 7, 2016 02:36 IST