भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या निवडणुकीकरिता नवीन प्रभागरचना आणि आरक्षणाची सोडत येत्या २ मे रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.यंदाची पालिका निवडणूक ४ नगरसेवकांच्या पॅनल पद्धतीने होणार आहे. मागील निवडणूक दोन नगरसेवकांच्या पॅनलनुसार झाली होती. परिणामी, सुमारे १० ते ११ हजार लोकसंख्येच्या एका प्रभागाची हद्द वाढून ३० ते ३५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होणार आहे. सध्या एकूण ४७ प्रभाग अस्तित्वात असून त्याचे २४ प्रभाग होणार आहेत. नगरसेवकांची संख्या ९५ इतकीच राहणार आहे. भार्इंदर पश्चिमेला एकूण ६ प्रभाग, तर उर्वरित १८ प्रभाग भार्इंदर पूर्व व मीरा रोडमध्ये अस्तित्वात येणार आहेत. २ मे रोजी भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सेस बॅन्क्वेट हॉलमध्ये सकाळी ११.३० वाजता सोडत प्रक्रिया पार पडेल. या सोडतीसह प्रभागरचनेवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ४ ते १६ मे पर्यंतची मुदत दिली आहे. ज्यांच्या हरकती व सूचना प्राप्त होणार आहेत, त्यांना सुनावणीसाठी पालिकेकडून बोलवणार आहे. (प्रतिनिधी)
मीरा-भार्इंदर पालिकेची प्रभाग सोडत २ मे रोजी
By admin | Updated: April 29, 2017 01:38 IST