निरोप... त्याचा अन् इजिप्तचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:26 AM2019-06-02T01:26:55+5:302019-06-02T01:27:12+5:30

माझं इजिप्तमधलं काम आता संपत आलं होतं. अडीच वर्षं कशी गेली कळलंच नव्हतं. साधारण महिनाभरात मी भारतात परतणार होतो आणि एक दिवस हसरा अश्रफ गंभीर चेहऱ्याने मला भेटायला आला

The message ... his and the Egyptians | निरोप... त्याचा अन् इजिप्तचा

निरोप... त्याचा अन् इजिप्तचा

Next

मनीष पाटील

माझं इजिप्तमधलं काम आता संपत आलं होतं. अडीच वर्षं कशी गेली कळलंच नव्हतं. साधारण महिनाभरात मी भारतात परतणार होतो आणि एक दिवस हसरा अश्रफ गंभीर चेहऱ्याने मला भेटायला आला. उतरलेल्या तोंडाने तो थांबतथांबत बोलू लागला, ‘मनीष, आय नो यू आर गोइंग बॅक, अ‍ॅण्ड आय अ‍ॅम अल्सो लिव्हिंग इजिप्त! देअर इज नो व्हॅल्यू फॉर माय हार्ड वर्क अ‍ॅण्ड इंटेलिजन्स हिअर... आय एन्जॉइड वर्क अ‍ॅण्ड गुड विथ यू! फॉर युअर फ्रेण्डशिप....आय डोन्ट हॅव वर्ड्स!... आय अ‍ॅम लिव्हिंग फॉर दुबई नेक्स्ट वीक... आय डोन्ट थिंक आय कॅन मीट यू अगेन...’ आणि तो अबोल झाला.
अश्रफसुद्धा इजिप्त सोडतो आहे आणि तेही इतक्या तडकाफडकी हे ऐकून मला धक्का बसला. आता तर कुठे त्याचा जम बसायला सुरुवात झाली होती. ‘माँदिस अश्रफ’ (इंजिनीअर अश्रफ) हे नाव आता ‘एल-आशर’ शहरातल्या उद्योगांत मूळ धरत होतं आणि अचानक अश्रफने असा निर्णय घ्यावा?... धक्का आणि घालमेलीमुळे मलाही शब्द फुटेना. दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघत राहिलो. थोड्या वेळाने मला भेट, म्हणून त्याने एक खोका पुढे केला आणि कुजबुजला, ‘माझ्या बहिणीला तुला भेटायचं आहे. फॉर थँक्स गिव्हिंग!’ ‘मी येईन तिला भेटायला. ती माझी पण बहीण आहे, पण तिला सांग, नो थँक्स!’

अश्रफ काहीच बोलला नाही. क्षणभर त्याने माझ्याकडे बघितलं आणि वळला व डोळे पुसत झपझप निघून गेला. पुन्हा अश्रफ कधी दिसेल की नाही, मला माहीत नव्हतं. मी त्याची पाठमोरी आकृती ओघळत्या डोळ्यांनी दृष्टिआड होईपर्यंत बघत राहिलो. असा हा भावुक अश्रफ आपल्या बुद्धिमत्तेला वाव मिळण्यासाठी व जास्त पैसा कमावता यावा, म्हणून दुबईला गेला. तिथे एका कंपनीत काम करून त्याने नाव व पैसा भरपूर कमावला. दुबईत भेटलेल्या एका सुंदर रशियन मुलीशी त्याने लग्न केलं. नंतर, तिचा फोटो मला आवर्जून पाठवला होता. तिथे भेटणाºया भारतीय मित्रांना तो आमच्या मैत्रीच्या गोष्टी ऐकवायचा.

मी इजिप्तमधून परतल्यावरही बरीच वर्षे आम्ही संपर्कात होतो. भारतातून जर एखादा मित्र किंवा ओळखीतलं कोणी इजिप्तला जाणार असेल, तर अडल्यानडल्यावेळी मदतीसाठी अश्रफच्या घरचा टेलिफोन क्रमांक मी बिनदिक्कतपणे द्यायचो! पण, गेल्या सातआठ वर्षांपासून आमचा संपर्क तुटला आहे. या काळात असं कधीच झालं नाही की, मी अश्रफला विसरलो आणि मला खात्री आहे की, तोही मला विसरला नसेल! अश्रफला पुन्हा शोधण्याचे माझे प्रयत्न चालू आहेतच.

अश्रफने दिलेला खोका मी थेट भारतात आल्यावरच उघडला. दोन रेतीभरले उंट, तीन दगडी पिरॅमिड्स, एक दगडी स्तंभ, दोन क्लिओपात्राच्या तबकड्या आणि पॅप्परस.... आजही ही अनमोल भेट अश्रफ व इजिप्तची आठवण सतत जागवत माझ्या घरात विराजमान आहे! पुन्हा आम्ही भेटू की नाही माहीत नाही, पण या वस्तूंच्या रूपात अश्रफ मला रोजच भेटत राहतो!
 

Web Title: The message ... his and the Egyptians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.