वाडा : नारे ग्रामपंचायत हद्दीतील सेंट गोबेन (जिप्सम) कंपनीच्या प्रदूषणाबाबत तहसीलदारांनी बोलविलेल्या बैठकीत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणतीही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच संबंधीत कागदपत्रे सादर करता न आल्याने कंपनी व्यवस्थापनाची भंबेरी उडाली. त्यामुळे तहसीलदारांनी २२ फेब्रुवारीला पुन्हा बैठक बोलावली आहे. यावेळी सर्व संबंधीतांनी वस्तुस्थितीदर्श अहवाल घेऊनच यावे, असा आदेशही दिला.ग्रामपंचायत हद्दीतील कंपनीच्या प्रदूषणा संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी विविध शासकिय पातळीवर तक्रारी करून कंपनीवर करवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेवून तहसीलदार निलेश कुऱ्हाडे यांनी मंगळवारी त्यांच्या दालनात संबंधीतांची बैठक बोलवली होती. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सुजित ढोलम, विभागातील अधिकारी कुलकर्णी, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी थाळेकर, पाणी पुरवठा विभागाचे निलेश पाटील, तालुका भूमिअभिलेख निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी ए.बी. वारे, नारे सरपंच शोभा बागरान, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामसेवक पंकज चौधरी, कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी सुधीर मुळे व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीत उपसरपंच सुधीर पाटील यांनी कंपनीच्या प्रदूषणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर कंपनी व्यवस्थापन निरूत्तर झाले, अधिकाऱ्यांना कोणत्याही मुद्यांची समर्पक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे समाधान झाले नाही.(वार्ताहर)
जिप्समप्रकरणी पुन्हा २२ फेब्रुवारीला बैठक
By admin | Updated: February 10, 2017 03:56 IST