Mayor of Thane, Ulhasnagar received extension | ठाणे, उल्हासनगरच्या महापौरांना मिळाली मुदतवाढ

ठाणे, उल्हासनगरच्या महापौरांना मिळाली मुदतवाढ

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह उल्हानगरच्या महापौर पंचम कलानी यांना विधानसभा निवडणूक आचारसंहिता लक्षात घेऊन तीन महिन्यांची वाढीव मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणारी बंडाळी रोखण्यासाठीच हा प्रयत्न झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

महापालिकेत शिवसेनेने पहिल्यांदा एकहाती सत्ता संपादित केली आहे. त्यानंतर, महापौरपदासाठी महिलांचे आरक्षण पडल्याने पक्षाने वारसा किंवा पक्षातील नेते मंडळींच्या घरच्यांना संधी देण्याऐवजी निष्ठावंतांना प्राधान्य देऊन मीनाक्षी शिंदे यांना महापौरपद दिले. त्यानुसार, या शर्यतीत असलेली अनेक नावे मागे पडली. आता येत्या ६ सप्टेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. त्यानुसार, नियमानुसार दोन महिने अगोदर महापौरपदाचे आरक्षण लागणे अपेक्षित होते. मात्र, आता एक महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही आरक्षण पडलेले नाही. त्यात आता येत्या सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट होत आहे. त्यामुळे नव्याने महापौरनिवडीसाठी पुन्हा दीड महिना वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे या सर्वांचा विचार करून दीडऐवजी थेट तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इच्छुकांचे वेट अ‍ॅण्ड वॉच, आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा
हा निर्णय पुढे आल्याने महापौरपदाच्या शर्यतीत असलेलेसुद्धा आता वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आले आहेत. शिवाय, आता जर महापौरपद बदलले असते आणि ज्यांना कमिटमेंट देण्यात आली आहे, त्यांना ते न देता पक्षाने दुसऱ्यालाच संधी दिली असती, तर कदाचित या इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीत दगाफटकाही केला असता, असाही कयास लावला जात आहे. त्यामुळे हा दगाफटका टाळण्यासाठीच महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. त्यात महिला आरक्षण पडले तर पुन्हा यापूर्वी ज्याज्या महिला या पदासाठी इच्छुक होत्या, त्यात्या सर्व रेसमध्ये येऊ शकत आहेत. शिवाय, शिवसेनेच्या श्रेष्ठींनी बाळकुमच्या भोईर अ‍ॅण्ड कंपनीला महापौरपदाचे कमिटमेंट दिले आहे. त्यामुळे तीसुद्धा याची वाटत पाहत आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर श्रेष्ठी दिलेला शब्द पाळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Mayor of Thane, Ulhasnagar received extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.