लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्राः रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्यामुळे ज्या कोरोना तसेच इतर व्याधी असलेल्या रुग्णांवर घरांमध्ये उपचार सुरू आहेत. अशा ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यांची ऑक्सिजनअभावी प्रकृती अधिक बिघडू नये, यासाठी मुंब्य्रातील किस्मत कॉलनी येथील मस्जिद वो मदरसा तकवाच्या वतीने मोफत ऑक्सिजनचा सिलिंडर देण्यात येत आहे.
बारा किलो वजनाच्या या सिलिंडरमध्ये साडेपाच किलो ऑक्सिजन असून सातत्याने त्याचा वापर केल्यास तो पंधरा तास पुरतो. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नवी मुंबईतील तुर्भे येथील एका ऑक्सिजनच्या प्लांटमधून ऑक्सिजनने भरलेल्या सिलिंडरचा सलग पुरवठा मस्जिदीला करण्यात येत आहे. सध्या मुंब्रा, शीळफाटा, कल्याणफाटा, उत्तरशिव आदी भागातील २० रुग्णांचे नातेवाईक दररोज सिलिंडर घेऊन जात आहेत. सिलिंडर मिळविण्यासाठी आधारकार्ड तसेच उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या शिफारस पत्राची आवश्यकता असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष तथा या योजनेचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद अशरफ यांनी लोकमतला दिली. या सुविधेमुळे घरी उपचार सुरू असलेल्या ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.