ठाणे : चंदनवाडी येथील सरोवरदर्शन इमारतीत दूर्वांकुर इमारतीमधील सरिता विशाल गायकवाड (२६) हिने घरगुती भांडणाला कंटाळून जवळच्याच ‘पंकज’ इमारतीच्या गच्चीवर जाऊन बुधवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजारच्या निशिगंधा इमारतीमधील मनोज पवार यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचवले. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खाली काही गोंधळ सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर एक महिला पंकज इमारतीच्या आठव्या मजल्यावरील टेरेसवर जाऊन बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती ठाणे अग्निशमन दलाला दिली. ती जीव देईन, असे ओरडत होती. पवार यांनी तिचे तशाही अवस्थेत समुपदेशन करून तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. नंतर, कंबरेला केबल बांधून टेरेसवरून सज्जावर उडी मारली. त्यानंतर प्रसंगावधान राखून तिला तिथून सुखरूप बाहेर काढले. तोपर्यंत तिथे दाखल झालेल्या नौपाडा पोलीस आणि ठाणे अग्निशमन दलाने तिला कौशल्या रुग्णालयात दाखल केले. पवार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक होत आहे.मंगळवारी रात्रीही घरगुती भांडणातून तिने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले होते. तिचे लग्नाच्या आधी तिच्या मित्राशी ‘संबंध’ असल्याचा पतीला संशय होता. यातूनच त्यांच्यात खटके उडत होते. याच भांडणातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
ठाण्यात इमारतीच्या गच्चीवरून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 22:12 IST
घरात पतीबरोबर झालेल्या भांडणाला कंटाळून ठाण्यातील सरीता गायकवाड या विवाहितेने एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका तरुणाने प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाण्यात इमारतीच्या गच्चीवरून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देतरुणाने वाचवले प्राण नौपाडा पोलीस आणि ठाणे अग्निशमन दलानेही घेतली धाव ठाण्याच्या चंदनवाडीतील घटना