पंकज पाटील
बदलापूर - बदलापुरातील खरवई परिसरात असलेल्या सिद्धी सिटी या गृह संकुलात मराठी आणि परप्रांतीय असा वाद निर्माण झाला आहे. या वादातून दोन वेळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी पुन्हा याच सोसायटीत वाद निर्माण झाल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या महाराष्ट्रीयन कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाणे गाठत या परप्रांतीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.
सिद्धी सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांची या आधीच संबंधित बांधकाम व्यवसायिकांनी फसवणूक केली असून या ठिकाणी इमारतीला अजूनही पालिकेकडून ओसी देण्यात आलेली नाही. बिल्डर या प्रकरणात ठोस भूमिका घेत नसल्यामुळे घर खरेदी केलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता सोसायटीत निर्माण झालेल्या समस्यांवर वाद पेटू लागले असून आता या सोसायटीत परप्रांतीय आणि मराठी कुटुंब असे गट पडले असून ते एकमेकांच्या विरोधात आरोप करताना दिसत आहेत.
दोन वेळा याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर अध्यक्षाला या परप्रांतीयांनी मारहाण केल्याचा आरोप देखील मराठी कुटुंबीयांनी केला आहे. तरी देखील हा वाद क्षमत नसल्याने आज पुन्हा या सोसायटीतील सदस्य बदलापूर पोलीस ठाण्यात परप्रांतीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.