मुरलीधर भवार / कल्याणपूर्वेतील चक्कीनाका ते मलंगगड या सात ते आठ किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. या खड्ड्यांच्या डागडुजीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार या रस्त्याने मार्गक्रमण करणारे नागरिक व वाहनचालक करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत अंबरनाथ व कल्याण तालुक्यांतील २७ गावे १ जून २०१५ ला समाविष्ट करण्यात आली. या निर्णयामुळे कल्याण येथील चक्कीनाक्यापासून ते मलंगगडपर्यंतचा नेवाळीनाकामार्गे हा रस्ता महापालिकेत समाविष्ट झाला. या रस्त्याची हद्द मलंगगडपर्यंत असली तरी चक्कीनाका ते भालगावापर्यंत हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता महापालिका हद्दीत समाविष्ट झाला. २७ गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित होता. बांधकाम खात्याने याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी २०१४ मध्ये एक कोटी ५६ लाख रुपये खर्च केला आहे. त्यासाठी निधी ‘नाबार्ड’ने दिला होता. रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी एक कोटी ९५ लाख रुपये खर्च होता. ‘नाबार्ड’ने दिलेल्या कर्जामुळे हा रस्ता तयार करण्यात आला. रस्ता बनवण्याचे कंत्राट साई सिद्धान्त कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. त्यांनी काम २०१५ मध्ये पूर्ण केले. परंतु, या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चूनही त्याची एक वर्षात वाट लागली आहे. हा रस्ता इतका खराब झाला आहे की, त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गळक्या पाणीपुरवठा वाहिन्यांमुळे काही खड्ड्यांमध्ये पाण्याचे तळ साचून चिखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदार कंपनीकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची हमी घेत नाहीत. त्यामुळे कंपनीने योग्य प्रकारे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्याची एका वर्षात वाट लागली आहे. आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्याने या विभागाला जाब विचारण्याचे कारण नाही. चक्कीनाका ते भालगावापर्यंतच्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने करणे अपेक्षित आहे. या रस्त्यावर पावसाळ्यादरम्यान प्रियंका फुलोरे या तरुणीचा दुचाकीवरून जात असताना मृत्यू झाला होता. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती दुचाकीवरून पडली. त्यात ती एका गाडीखाली सापडून मरण पावली. तिच्या मृत्यूनंतर रस्ता चांगला करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. प्रत्यक्षात त्या आश्वासनाचा महापालिका प्रशासनास विसर पडलेला आहे.
मलंग रोड गेला खड्ड्यांत
By admin | Updated: November 14, 2016 04:04 IST