माघी गणेशोत्सवही होणार साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:04+5:302021-02-15T04:35:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : गेले ११ महिने सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कोरोनाचे सावट राहिले आहे. काही सण साजरे ...

Maghi Ganeshotsav will also be held simply | माघी गणेशोत्सवही होणार साधेपणाने

माघी गणेशोत्सवही होणार साधेपणाने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : गेले ११ महिने सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कोरोनाचे सावट राहिले आहे. काही सण साजरे करण्यावर तर पूर्णपणे निर्बंध आले. दरवर्षी धूमधडाक्यात साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणोशोत्सवही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने साजरा झाला. दरम्यान, केडीएमसी क्षेत्रात आजच्या घडीलाही कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५० ते १००च्या आसपास असल्याने उद्यापासून सुरू होणारा माघी गणोशोत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मनपा आणि पोलीस यंत्रणांवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाद्रपद महिन्याप्रमाणे माघी गणोशोत्सवातही सूचना आणि नियमांचे पालन कसे होईल याकडे विशेष लक्ष राहील, असा दावा संबंधित यंत्रणांनी केला आहे.

घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी आहे. गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा आल्या असून गणेशोत्सवात साजऱ्या होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करावे याकडे लक्ष वेधले आहे. मंडपात गर्दी टाळण्यासाठी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी ऑनलाइन सुविधांवर भर द्यावा अशा सूचनाही आहेत. मंडप निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रींनिगची पर्यायी व्यवस्था असावी तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचित करावे असे आदेश मंडळांना पोलीस विभागाच्या वतीने दिले आहेत. तर भाद्रपद महिन्यात जारी केलेल्या नियमांचे माघी गणोशोत्सवातही पालन केले जाणार असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. दरवर्षी मनपातही माघी गणोशोत्सव मोठया थाटामाटात साजरा केला जातो. मनपा मुख्यालयासह डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात पाच दिवस हा उत्सव साजरा होतो. प्रतिवर्षी चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचे संदेश दिले जातात. भजन, महाप्रसाद, हळदीकुंकू यासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची पाच दिवस रेलचेल असते. परंतु कोरोनाचे सावट असल्याने हे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. गणेशाची मूर्ती साडेसहा फूट उंचीची असते, परंतु यंदा मूर्ती चार फुटांची असणार आहे. केवळ मंडप उभारला असून दर्शनासाठी ४ ते ५ जणांनाच सोडले जाणार आहे.

-----------------------------------------------------------

वयोवृध्द, लहान मुलांना बंदी

गणोशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास सार्वजनिक विसर्जनस्थळी करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा, गणोशमूर्तीच्या विसर्जनस्थळी वयोवृध्द व लहान मुलांना बंदी घालण्यात आली असून त्याबाबतच्या सूचना जारी करण्याची जबाबदारीही स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. विसर्जन ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मार्किंग, बॅरीकेडिंग, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचे मार्ग, पुरेसे लाइट, मार्गदर्शक फलक आदींची व्यवस्था करून घेण्याची जबाबदारीही संबंधितांवर दिली गेली आहे.

------------------------------------------------------

Web Title: Maghi Ganeshotsav will also be held simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.