- जितेंद्र कालेकर, ठाणेउल्हासनगरमधून दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या अशोक मानवेल हेम्ब्रोम (१७) या मुलाला ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दीड वर्षानंतर भांडुप परिसरातून शोधून काढले आहे. मूळचा झारखंडचा असलेला अशोक याला कैलास साव कारखानदाराने नोकरीसाठी उल्हासनगरमध्ये आणले होते. तिथून तो बेपत्ता झाल्यामुळे साव हे त्याच्या वडिलांना भरपाई म्हणून दरमहा दोन हजार रुपये देत होते. १५ जून २०१४ रोजी जेवायला बाहेर जातो, असे सांगून तो बाहेर पडला आणि हरवला. तो झारखंडलाही न गेल्यामुळे त्याच्या वडिलांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर, त्याला नोकरीवर ठेवणाऱ्या साव यांनाच त्यांनी जबाबदार धरले. नैतिक जबाबदारी म्हणून साव यांनी मुलाच्या वडिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्यास सुरुवात केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. अखेर तो भांडुप रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकखाली असल्याची माहिती मिळाली तिथून त्याला ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)
हरवलेला मुलगा दीड वर्षाने सापडला
By admin | Updated: February 25, 2016 02:48 IST