ठाणे - स्थूलत्व व मधुमेह या दोन समस्या आपले साम्राज्य दिवसेंदिवस पसरवत आहेत. त्या आता ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मर्यादित न राहता तरुणांपर्यंत येऊन पोहचत आहेत, अशी नाराजी रविवारी आरोग्यतज्ज्ञ आणि ‘दीक्षित डाएट’चे प्रणेते आडोर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केली.आपल्याला निरोगी, मधुमेहमुक्त आयुष्य जगायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर जीवनशैली बदलणे गरजेचे आहे असा सल्ला त्यांनी ठाणेकरांना दिला. सहयोग मंदिर येथे रविवारी स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व अभियानाअंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी या उपक्रमात ते होते. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संपूर्ण जग हे कोरोनाला सामोरे जात असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कोरोना कालावधीत ठाणेकरांनीही प्रशासनाला व पोलिसांना अभूतपूर्व सहकार्य केलेले आहे. पोलिसांच्या आरोग्यासाठी दीक्षित जीवनशैली योग्य आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे असे फणसळकर यांनी सांगितले.ठाणेकरांपर्यंत ही जीवनशैली पोहचविण्यासाठी ठाणे परिसरात विनामूल्य सल्ला केंद्रे सुरू होत आहेत. वेळीच आपण त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दीक्षित यांनी केले. या केंद्रात समर्पित सेवा देणाऱ्या डॉ. राजपाठक आणि डॉ. सिद्दीकी यांचा डॉ. दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विलास काळे, विजय पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, नगरसेविका परिषा सरनाईक, डॉ. मधुरा कुलकर्णी, आडोर ट्रस्टचे ट्रस्टी अरुण नावगे आणि रवी जगन्नाथन उपस्थित होते.
जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक, जगन्नाथ दीक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:20 IST