Law will take responsibility for the system? | कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी घेणार?
कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी घेणार?

कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल २७ मेपासून बंद करावा, असे पत्र मध्य रेल्वे प्रशासनाने केडीएमसीला दिले आहे. रेल्वेकडे या पुलाची देखभाल दुरुस्ती असतानाही ती का केली नाही. आता तडकाफडकी पूल बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला गेला आहे. मात्र, पूल बंद केल्यावर शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार आहे का, असा सवाल केडीएमसीने बुधवारी रेल्वे प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.


कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा अरुंद असला, तरी त्यावरून मोठ्या प्रमाणात डोंबिवली पूर्व-पश्चिमेला वाहतूक होते. या पुलाची देखभाल दुरुस्ती रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारित होती. मात्र, रेल्वेने पुलाची वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती करण्याऐवजी आताच पुलाचे बांधकाम जीर्ण झालेले असून तो वाहतुकीसाठी सुरक्षित नाही, असे रेल्वेने महापालिकेस पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांनी रेल्वेला पाठवलेल्या पत्रात प्रतिप्रश्न उपस्थित केले आहेत.


मुंबईतील पूल दुर्घटनांनंतर मध्य रेल्वेने उड्डाणपूल आणि पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आयआयटी मुंबईकडून करून घेतले आहे. आयआयटीने दिलेल्या अहवालात डोंबिवलीतील पुलाबाबत नेमके काय म्हटले आहे, याचा कोणताच हवाला रेल्वेने महापालिकेस दिलेला नाही. अहवालातील तपशील महापालिकेस का दिला नाही, अशी विचारणा या पत्रात केली आहे.


त्याचबरोबर महापालिकेने पुलाच्या दुरुस्तीसाठी किती पैसे भरावेत, असेही रेल्वेने सांगितलेले नाही. शंभर टक्के खर्च महापालिकेने उचलायचा आहे की, निम्मा खर्च करावा लागणार आहे, याविषयी पत्रात काहीच उल्लेख केलेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.


कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल २७ मे रोजी बंद केल्यास पर्यायी वाहतुकीची व्यवस्थाही केडीएमसीने करावी, असे रेल्वेने पत्रात म्हटले आहे. अलिकडेच महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलून ठाकुर्ली येथे रेल्वे उड्डाणपूल तयार केला आहे. मात्र, हा पूल अरुंद असल्याने त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करणे शक्य नाही. कोपर उड्डाणपूल बंद केल्यास ठाकुर्ली पुलावरूनच पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली तरी, ठाकुर्ली पश्चिमेतील बावनचाळ परिसरातील रेल्वेच्या हद्दीतील रस्ते अरुंद आहेत. त्यावरून वाहतूक वळवणे शक्य होणार नाही. तसेच १० जूनपासून शाळा सुरूहोत आहे. पूल बंद झाल्यास शाळेच्या बसची वाहतूक कशी करायची, असा प्रश्नही कोळी यांनी रेल्वेला विचारला आहे.
पर्यायी वाहतुकीचा मार्ग दिला नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पूल बंद केल्यावर उद्भवू शकतो. तसेच पूल बंद करण्याची सूचना वाहतूक पोलिसांना दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे की नाही, याचीही सुस्पष्टता नाही.


‘लोकग्राम’च्या पत्रावरही मौन
कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ७ ते लोकग्रामकडे जाणारा लोकग्राम हा पादचारी पूल १८ मेच्या रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. त्याविषयीही महापालिका आयुक्तांनी रेल्वेकडे विचारणा केली होती. त्यावरही रेल्वे प्रशासनाने मौन बाळगले आहे. लोकग्राम पुलाचा वापर रेल्वेचे प्रवासीच करत होते. तरीदेखील त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे रेल्वेकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


पत्रीपूल सहा महिन्यांत का झाला नाही?
रेल्वेने कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक झाला असल्याने पाडला. हा पूल सहा महिन्यांत तयार करू, असा दावा रेल्वेने केला होता. तो सहा महिन्यांत तयार का झाला नाही, असा प्रश्न कोपर पूल बंद करण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केला आहे.


Web Title: Law will take responsibility for the system?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.