ठाणे : सिग्नल शाळेची संकल्पना यशस्वी झाल्यानंतर रोज विविध भागांतून शहरात कामासाठी येणाºया नाका कामगार महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम ठामपा हाती घेणार आहे. त्यानुसार, या महिलांना त्यांच्या आवडीच्या कामाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन महिन्यांत या महिलांना कापूरबावडी जंक्शन येथील उड्डाणपुलाखाली त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण आणि प्रौढ शिक्षण पालिका देणार आहे.महापालिका क्षेत्रातील कापूरबावडीनाका येथे रस्त्यावर तासन्तास मजुरीसाठी ताटकळत उभ्या राहणाºया कष्टकरी महिलांसाठी महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने बहुउद्देशीय सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेमार्फत भौतिक सुविधा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व प्रशासकीय सेवा, प्रशासन खर्च समर्थ भारत व्यासपीठ यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नाकाशाळेत मूलभूत प्रशिक्षण व प्रशिक्षणार्थ्यांसाठी विद्यावेतनाचा भार महापालिका उचलणार आहे. त्यानुसार, येथे प्रशिक्षणासाठी येणाºया महिलांना रोजंदारीचा २०० रुपयांचा भत्ता पालिका देणार आहे. दरम्यान, शहरात अशा किती महिला आहेत, याचा सर्व्हे समर्थ भारत व्यासपीठाने केला होता. त्यानुसार, शहरात आजघडीला ५५० महिला असून त्यांच्याकडे चर्चा केली असता यातील बहुतेक महिला या कर्नाटकमधून आल्याचे समजले. तसेच त्यांना कडिया, पेंटर आणि टाइल्स लावण्याच्या कामात रस असल्याचेही या सर्व्हेत पुढे आले आहे. त्यानुसार, याचेच प्रशिक्षण पालिका आता त्यांना देणार आहे. यासाठी त्यांना रुस्तुमजी सहकार्य करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. या माध्यमातून प्रौढ शिक्षण, इंटरनेट हाताळण्याचे शिक्षण आणि स्मार्ट फोनही उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे त्या महिला इंटरनेट सखी म्हणूनही भविष्यात ओळखल्या जाऊ शकणार आहेत. या कष्टकरी महिला नाका कामगारांच्या मुलांसाठीदेखील शाळा तसेच विश्रामगृहाबरोबर डे-केअर, पाळणाघराची निर्मिती केली जाणार आहे.
कामगार महिलांसाठी ‘शाळा आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:57 IST