कल्याण-डोंबिवलीत सात खासगी इस्पितळात मिळणार कोविड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:12+5:302021-03-14T04:36:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: गुरुवारपासून डोंबिवली शहर परिसरात खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड लसीचा पुरवठा बंद झाला होता. त्यातच पूर्वेला एकही ...

Kovid vaccine will be available at seven private hospitals in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत सात खासगी इस्पितळात मिळणार कोविड लस

कल्याण-डोंबिवलीत सात खासगी इस्पितळात मिळणार कोविड लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: गुरुवारपासून डोंबिवली शहर परिसरात खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड लसीचा पुरवठा बंद झाला होता. त्यातच पूर्वेला एकही ठिकाणी लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत हाेती, परंतु शहरातील एकूण सात खासगी इस्पितळात ही सुविधा सोमवारपासून सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. आधी दोन हॉस्पिटलमध्ये ती सुविधा होती. आता त्यात वाढ होणार असून प्रत्येकी २०० नागरिकांना म्हणजे सुमारे एक हजार नागरिकांना खासगी इस्पितळात लस मिळणार आहे.

शहर परिसरात एम्स, आर. आर., बाज, श्री महागणपती (टिटवाळा), इशा नेत्रालय, स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी, नोबेल, ऑप्टिलाईफ हॉस्पिटल या सात ठिकाणी ही सुविधा सुरू होणार असून सोमवारी या सर्व ठिकाणी लसपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य आणि कोविड नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

यापैकी एका हॉस्पिटलच्या ऑनलाइन पेमेंट संदर्भात तांत्रिक अडचणी आल्या असून त्या काही तासांत दूर होतील., असेही स्पष्ट करण्यात आले.

भाजपच्या शिष्टमंडळानेदेखील यासंदर्भात डॉ. पानपाटील यांची शुक्रवारी भेट घेतली होती. महापालिकेच्या या निर्णयामुळे येत्या दोन दिवसात शहर परिसरात नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक विशु पेडणेकर यांनी दिली.

* पाथर्ली येथील महापालिकेचे कोविड लस केंद्र बंद झाल्यानंतर जिमखाना येथे ते सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यास जिमखाना प्रशासनाने नकार दिल्याचे डॉ. पानपाटील यांनी सांगितले.

यामुळे डोंबिवली शहरात अजून काही दिवस महापालिकेकडून विनामूल्य तत्त्वावर केवळ शास्त्रीनगर रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले. पूर्वेला ही सुविधा देताना महापालिकेला कोणी जागा देते का जागा अशी वेळ आल्याने शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

--/---------

Web Title: Kovid vaccine will be available at seven private hospitals in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.