मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे अपुरी आरोग्य व्यवस्था होती. त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने जम्बो कोविड रुग्णालये तातडीने उभी करण्यात आली. काही कोविड रुग्णालये सुरू होऊन सेवा देत होती, तर काही रुग्णालये लाट ओसल्यावर बंद झाली होती. त्यामुळे भविष्यात कोरोना जाणार की नाही, याची हमी नसल्याने ही कोविड रुग्णालये तशीच पडून होती. कोरोनाची पहिली लाट ओसरली तेव्हा काही कोविड रुग्णालये बंद करण्यात आली. मात्र दुसरी लाट येताच महापालिकेने पुन्हा ही रुग्णालये सुरू केली आहेत.कोरोना प्रादुर्भाव वाढला तेव्हा पालिकेने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू केले. त्यानंतर जम्बो सेटअप उभारण्याची तयारी पालिकेने केली. डोंबिवली क्रीडा सुंकल, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, वसंत व्हॅली, आर्ट गॅलरी, आसरा फाऊंडेशन या ठिकाणी कोविड रुग्णालये सुरू केली. पहिल्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ३९१ पदे तातडीने भरली होती. दुसरी लाट आल्याने या काम करणाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. सरकारकडून मिळालेल्या निधीतून गौरीपाडा येथे पीपीपी तत्त्वावर कृष्णा डायग्नोस्टिक या खासगी कंपनीच्या माध्यमातून लॅब उभारली. ही लॅब आजही कार्यरत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने पाटीदार, वसंत व्हॅली, आसरा फाऊंडेशन ही कोविड रुग्णालये बंद केली होती. आर्ट गॅलरी बांधून तयार होते. त्याचा वापर केला गेला नव्हता. फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. आता दिवसाला एक हजारापेक्षा जास्त रुग्ण महापालिका हद्दीत आढळून येत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १५ हजारांच्या आसपास आहे. कोरोना रुग्णालये पुन्हा सुरू केली आहेत. पाटीदार भवन येथील कोविड रुग्णालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी २१० बेड्सची व्यवस्था आहे. तळमजल्यावर आणखी १०० बेड्स देण्यात आले आहेत. आर्ट गॅलरी येथे २६९ ऑक्सिजन आणि १०९ आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे. वसंत व्हॅली येथे ६४ बेड्सचे सेंटर पुन्हा सुरू केले आहे. त्याचबरोबर टिटवाळा येथील रुख्मिणी प्लाझा इमारतीत ६० बेड्सचे रुग्णालय सुरू झाले आहे. आसरा फाऊंडेशनचे कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करता आले नाही. त्या ठिकाणचे ऑक्सिनजचे पाइप काढून टाकले होते. त्याची नव्याने प्रक्रिया राबविण्याऐवजी टिटवाळ्यात रुग्णालय सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.
कोविड रुग्णालये पुन्हा कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:39 IST