ठाणे : जागतिक पर्यावरण दिनाच्या आदल्या दिवशी वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनने मोराची सुटका करून पुढील उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.
पूर्णपणे वाढ झालेला एक मोर दिवा गावातील एका घरात आला होता. ठाणे वनखात्याला आणि वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनला ही माहिती मिळताच असोसिएशनच्या स्वयंसेवकांची टीम घटनास्थळी पोहोचली. पक्षाला यशस्वीपणे वाचवून पुढील प्रथमोपचार, तपासणीसाठी आणि निरीक्षणासाठी वनखात्याच्या शीळ फाटा ट्रान्झिट सेंटरवर नेले. त्याला कोणतीही इजा न झाल्याची खात्री करून घेतल्यावर पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येणार असल्याचे संस्थेचे आदित्य पाटील यांनी सांगितले. माेराची एकंदर स्थिती आणि उडण्याची क्षमता पाहून तो कोणी तरी बंदिवासात ठेवलेला असावा, असे वाटत असल्याने त्या अनुसरून वनखात्याने तपासणी सुरू करण्यात येणार आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १, १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत मोर संरक्षित आहे. त्याला ताब्यात ठेवणे, शिकार करणे, पंखांची विक्री इ. दंडनीय आहे आणि अजामीनपात्र गुन्हा आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
-------------