पुरेशा मनुष्यबळाअभावी केडीएमसीचे पलावा अग्निशमन केंद्र अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:05 AM2020-08-12T00:05:09+5:302020-08-12T00:05:21+5:30

गाव वगळल्याचाही बसला फटका; आवश्यक तेव्हा सेवा देणारच, केडीएमसी प्रशासनाने केले स्पष्ट

KDMC's Palava fire station finally closed due to lack of manpower | पुरेशा मनुष्यबळाअभावी केडीएमसीचे पलावा अग्निशमन केंद्र अखेर बंद

पुरेशा मनुष्यबळाअभावी केडीएमसीचे पलावा अग्निशमन केंद्र अखेर बंद

Next

डोंबिवली : केडीएमसीचे निळजे येथील पलावा अग्निशमन केंद्र मनुष्यबळाअभावी बंद करण्यात आले आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपल्याने कर्मचाऱ्यांअभावी ते चालविणे शक्य नव्हते. तसेच निळजे गाव महापालिकेच्या हद्दीतून वगळल्याने केंद्र बंद करण्यात आल्याचे कारणही देण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात सेवा देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निळजे येथील पलावा परिसरात वाढलेले शहरीकरण पाहता तेथे अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी पलावा सिटीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, मार्च २०१९ मध्ये पलावा अग्निशमन केंद्र चालू करण्यात आले होते. हे केंद्र चालविण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रशिक्षित २८ कर्मचारी वर्षभरासाठी नेमण्यात आले होते. कंत्राटदाराची मुदत ३१ मार्च २०२० ला संपुष्टात आली.

दरम्यान, केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सप्टेंबरपर्यंत कंत्राट कायम ठेवावे, अशी विनंती कंत्राटदाराला केली होती. यावर कंत्राटदाराने मार्च ते जुलैपर्यंत कर्मचाºयांचा पुरवठा केला. परंतु, पुढे मुदत वाढविली नाही. आधीच महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने पलावा केंद्र चालविणे शक्य नव्हते. त्यातच निळजे गाव महापालिकेतून वगळले असल्याने ते केंद्र अखेर बंद करण्यात आले आहे.

पलावा केंद्र बंद झाल्याने सध्या महापालिकेची कल्याण पूर्व-पश्चिम आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम अशी चार केंद्रे सुरू आहेत. लवकरच टिटवाळ्यात केंद्र चालू केले जाणार आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी ही केंद्रे चालविणे तारेवरची कसरत ठरत आहे. सध्या ४५ ते ५० च्या आसपास मनुष्यबळ आहे.
२०१५ च्या भरती प्रक्रियेतील २० पैकी १६ जण सध्या ड्युटीवर हजर झाले आहेत. ही केंदे्र चालविण्यासाठी साधारण १२५ आसपास मनुष्यबळ गरजेचे आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाºयांवर अतिरिक्त ताण पडत आहे.

शीळ मार्गावरील वाहतूककोंडीमुळे अग्निशमन दलाची वाट बिकटच
पलावा केंद्र बंद झाल्याने आता डोंबिवली एमआयडीसीतील तसेच कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयातील केंद्रातून यापुढे अग्निशमन दलातर्फे सेवा दिली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी पाहता आपत्कालीन परिस्थितीत बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे.

त्यात सध्या पावसाने रस्त्यात जीवघेणे खड्डे पडले आहेत. आधीच कोंडीने वाहतूक मंदावली असताना खड्ड्यांचाही अडथळा निर्माण होणार आहे. डोंबिवली आणि कल्याण पूर्वेपासून पलावापर्यंतचे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटर आहे. कोंडी आणि खड्ड्यांमधून हे अंतर पार करताना अग्निशमन जवानांना तारेवरची कसरत करावी लागणार यात शंका नाही.

अग्निश्मन दलाचे पलावा केंद्र असलेला परिसर केडीएमसीतून वगळण्यात आला आहे. त्यात कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदाराने मुदत संपुष्टात आल्याने कंत्राट बंद केले आहे. मनुष्यबळाअभावी केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात जेव्हाजेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हातेव्हा महापालिकेच्या अग्निशमन केंद्राकडून तत्परतेने सेवा दिली जाईल.
- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त
आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख, केडीएमसी

Web Title: KDMC's Palava fire station finally closed due to lack of manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.