ठाणे : "मला जर चाणक्य म्हणत असतील तर चित्रपट चालावा, यासाठी जितेंद्र आव्हाडच चाणक्यनीती करीत असून हे सर्वांना दिसतंय," असा पलटवार शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. आव्हाड यांचे राष्ट्रवादी मध्ये महत्व कमी झाले असून त्यामुळेच आव्हाड अशाप्रकरची स्टंटबाजी करीत असल्याचा गंभीर आरोपही म्हस्के यांनी केला आहे.
हर हर महादेव चित्रपटावरून सुरू झालेला वादंग आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. या मुद्द्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी त्यांचे आभार मानेन की, त्यांनी मला चाणक्याची उपमा दिली. मी आव्हांडाना मित्र आणि नेता समजायचो पण त्यांनीच मला मोठी उपमा दिली असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांचे राष्ट्रवादी मध्ये महत्व कमी झालय यामुळे ते लक्ष वेधण्याकरता हे सर्व करत असल्याचे म्हस्के म्हणाले.
"मविआचे सरकार असताना आव्हाडांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पण अटक झाली नाही. त्यामुळे दबाव कुठल्या शासनाच्या वेळेस होता हे आता सर्वांच्या लक्षात आले असेल," असे त्यांनी नमूद केले. म्हस्के यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांवरही टीका केली. तुमचे गृहमंत्री खंडणी गोळा करत होते. "१०० कोटीच्या वसूलीच्या आरोपा खाली तुमचा नेता अटक आहे. एखाद्यावर आरोप करताना विचार करुन करायला पाहिजे. माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांच्या चौकशी केली जाणार आहे आणि त्याचे निर्णय लवकरच येणार आहेत. तेव्हा कोणाला जामिन मिळतोय का बघा," असा इशाराही त्यांनी दिला. उड्डाणपुलाचे श्रेय खा.श्रीकांत शिंदे यांचेच... कामं झाले नाही तर दोष सरकारला दिला जातो मग काम झाले तर श्रेय घेऊ द्या असा टोला म्हस्के यांनी आव्हाड यांना लगावला आहे. मी महापौर ,सभागृह नेता असताना पुलाचे कामाचा पाठपुरावा केला होता. वाईटाचे श्रेय आम्हाला देत असाल तर चांगल्याचे श्रेय पण द्या. त्यामुळे हे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले.