सदानंद नाईक ।उल्हासनगर : माजी नगरसेवकाच्या मालमत्तेवर करनिर्धारकाने लावलेला ७० लाखांचा कर त्यांच्या सुट्टीच्या काळात उपायुक्त आणि नगरसेवकाने थेट ११ लाख केल्याचे सनसनाटी प्रकरण उल्हासनगरात उघडकीस आले आहे.नगरसेवक भगवान भालेराव यांच्या दबावाला बळी पडून कर कमी केल्याचे कर निरीक्षक मगर यांनी लेखी लिहून दिल्यानंतरही आयुक्तांनी उपायुक्तांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे त्यांनी करनिर्धारक युवराज भदाणे यांनाच बडतर्फ करण्याची मागणी केल्याने या विभागातील झोल उघड झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या राळेत कर विभागातील अनेकजण गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.मालमत्ता करवसुलीवर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी लक्ष केंद्रीत करून ३०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट ठेवले. कॅम्प नं. चारच्या एका माजी नगरसेवकांच्या मालत्तेची करनिर्धारणा विभागाचे प्रभारी करनिर्धारक व संकलक युवराज भदाणे यांच्या टीमने १५ दिवसांपूर्वी केली आणि तब्बल ७० लाख १४ हजारांचा मालमत्ता कर लावण्यात आला. भदाणे सुट्टीवर गेल्यावर रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी उपायुक्त दादा पाटील व कर निरीक्षक डी. एल. मगर यांना मालमत्तेच्या करनिर्धारणेबाबत सांगितले.पाटील व मगर यांनी पुन्हा त्या मालमत्तेची करनिर्धारणा करत ७० लाखांचा कर ११ लाख आठ हजार केला. भदाणे सुट्टीवरून परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. तोवर माजी नगरसेवकांच्या मालमत्तेसह १५ प्रकरणे आयुक्तांकडे आल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले.नगरसेवक भगवान भालेराव यांच्या दबावाला बळी पडून कर कमी कर केल्याचे मगर यांनी लेखी लिहून देत माफी मागितली. त्याआधारे आयुक्तांनी बुधवारी नगरसेवक भगवान भालेराव व उपायुक्त दादा पाटील यांना ५९ लाखांचे नुकसान केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. उपायुक्त दादा पाटील व भगवान भालेराव यांनी ७० ऐवजी १० लाखांचा कर लावण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. उलट भालेराव यांनी तर भदाणेंवरच आरोप करत त्यांनी अनेक मालमत्तांना चुकीच्या पध्दतीने कर लावल्याचा, मालमत्ताधारकांकडून लाखो रूपये मागितल्याचा आरोप करणारे प्रसिद्धीपत्रक काढले.
उल्हासनगरच्या मालमत्ताकरात झोल झोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:59 IST